नारायण राणेंनी मानले देवेंद्र फडणवीसांचे आभार - Narayan Rane thanked Fadnavis for his cooperation | Politics Marathi News - Sarkarnama

नारायण राणेंनी मानले देवेंद्र फडणवीसांचे आभार

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 16 जुलै 2021

फडणवीसांचे मार्गदर्शन नेहमीच प्रेरणादायी व दिशादर्शक असते.

मुंबई : दिल्ली दौऱ्यावर असलेले राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता. १६ जुलै) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदी नियुक्ती झाल्याबद्दल फडणवीस यांनी राणे यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यावर राणे यांनीही देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. (Narayan Rane thanked Fadnavis for his cooperation)

दरम्यान, फडणवीस यांनी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचेही अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्रातून नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड आणि भारती पवार या चार खासदारांना संधी मिळाली आहे. यामध्ये राणे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले असून त्यांच्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्याचा पदभार आहे. 

हेही वाचा : भाजपला धक्का : विरोधी पक्षनेतेपदासाठीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

उर्वरीत तिघांची राज्यमंत्रिपदावर वर्णी लागली आहे. त्यात भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांच्याकडे पंचायत राज मंत्रालयाचे राज्यमंत्रीपद देण्यात आलेले आहे. राज्यसभेचे सदस्य असलेले भागवत कराड यांच्याकडे अर्थ मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाची धुरा देण्यात आलेली आहे, तर लोकसभेवर प्रथमच निवडून आलेल्या नाशिकच्या खासदार भारती पवार यांना आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री करण्यात आलेले आहे. 

दिल्लीच्या दौऱ्यावर असलेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या मंत्र्यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले. याबाबतचे ट्विट नारायण राणे आणि कपिल पाटील यांनी केले आहे. राणे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्ली येथे भेट घेऊन केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री पदावर माझी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मीही त्यांचे आभार व्यक्त केले.

‘महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट झाली. देवेंद्रसाहेबांचे मार्गदर्शन नेहमीच प्रेरणादायी व दिशादर्शक असते,’ अशा शब्दांत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीचे ट्विट केले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख