हे खरं आहे की, एक-दोन लोकांचे शब्द चांगले नव्हते : फडणवीसांची कबुली - It is a fact that the words of one or two people were not good : Fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

हे खरं आहे की, एक-दोन लोकांचे शब्द चांगले नव्हते : फडणवीसांची कबुली

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 5 जुलै 2021

तुम्ही ठरवून विरोधकांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न होत असेल तर ते लोकशाहीत योग्य नाही.

मुंबई  ः आम्ही सर्वजण त्यावेळी रागात होतो, त्या ठिकाणी आमच्यात बाचाबाचीही झाली. हे खरं आहे की त्या ठिकाणी एक ते दोन लोकांचे शब्द चांगले नव्हते. त्याच क्षणी मी तुमची (विधानसभेचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव) माफी मागितली. तीन तीन वेळा माफी मागितली. पण, तुम्ही ठरवून विरोधकांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न होत असेल तर ते लोकशाहीत योग्य नाही, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या निलंबनाच्या प्रस्तावास विरोध केला. (It is a fact that the words of one or two people were not good : confession of Fadnavis) 

ओबीस आरक्षणासाठी केंद्र सरकारकडे एम्पारिकल डाटा मागणीचा प्रस्ताव छगन भुजबळ यांनी विधानसभेत मांडला. त्यावेळी भाजपच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांसमोरील माईक आणि राजदंड हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना शिवागीळ करण्याचा प्रकार घडला. दोन्ही बाजूंचे आमदार एकमेकांना भिडले. त्यानंतर सरकारकडून भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावेळी फडणवीस यांनी त्याला विरोध केला. 

हेही वाचा : भास्कर जाधवांना आईबहिणीवरून शिवीगाळ : भाजपचे बारा आमदार वर्षभरासाठी निलंबित
 
विधानसभेत बोलताना फडणवीस म्हणाले की, आपण (भास्कर जाधव) जी वस्तुस्थिती सांगितली. त्यात हेही सांगितले पाहिजे की त्या ठिकाणी काही शिवसेनेचे आमदारही आले होते. आपल्याशी धक्काबुक्की झाली नाही. शिवसेनेचे आमदार आणि भाजपचे आमदार यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी मी स्वतः सर्व आमदारांना अध्यक्षांच्या चेंबूरमधून बाहेर काढले आहे. आम्ही सर्वजण रागात होतो, त्या ठिकाणी आमच्यात बाचाबाची झाली. आपण सर्वांनी एकमेकांची गळाभेट घेतली. त्यानंतर असा (आमदारांच्या निलंबनाचा) प्रस्ताव मांडणार असाल तर योग्य नाही. तुमच्याकडे बहुमत आहे, त्यामुळे प्रस्ताव मंजूर करून घ्या. पण लोकशाहीत योग्य ठरणार नाही. 

हे खरं आहे की त्या ठिकाणी एक दोन लोकांचे शब्द चांगले नव्हते. त्याचक्षणी मी तुमची माफी मागितली. तीन तीन वेळा माफी मागितली. पण, ठरवून विरोधकांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न होत असेल तर ते योग्य नाही. केवळ अध्यक्ष म्हणून नव्हे तर भास्कर जाधव म्हणूनही आपला सन्मान आहे. त्यामुळे तुम्ही विरोधकांना बोलावून आमच्याशी चर्चा केली पाहिजे. त्यानंतर आपल्याला कारवाई करायची असेल तर केली पाहिजे; अन्यथा कोणी वासरू मारलं म्हणून कोणी गाय मारणार असतील तर ते काही योग्य नाही, असे फडणवीस म्हणाले. 

जी घटना घडली आहे, त्यात दोन्ही बाजूचे आमदार एकमेकांना भिडले होते. त्यांना आपण भिडू दिले नाही. त्यांना आपण सर्वांनी मागे घेतले. मी दोन्ही हातांनी आमच्या आमदारांना मागे हटवले आणि त्या ठिकाणी भांडण होऊ दिले नाही. त्यामुळे अशा प्रकारचा निलंबनाचा प्रस्ताव आणणे योग्य होणार नाही. अध्यक्षांनी आम्हाला चर्चेला बोलावले पाहिजे आणि चर्चेतून मार्ग काढला पाहिजे, अशी मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख