भास्कर जाधवांना आईबहिणीवरून शिवीगाळ : भाजपचे बारा आमदार वर्षभरासाठी निलंबित - 12 MLA of BJP suspended for one year from vidhansabha | Politics Marathi News - Sarkarnama

भास्कर जाधवांना आईबहिणीवरून शिवीगाळ : भाजपचे बारा आमदार वर्षभरासाठी निलंबित

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 5 जुलै 2021

तालिका सदस्यांना शिवीगाळ भोवली.. 

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्यावरून विधानसभेत झालेल्या गोंधळाचे पर्यावरण राजकीय युद्धात झाले. मला आईबहिणीवरून शिवीगाळ झाल्याची तक्रार तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केली. आपल्या आयुष्यातील हा काळा दिवस असल्याचे सांगत जाधव यांनी विरोधकांवर टीका केली.  त्यांच्या या टिकेनंतर संसदिय कामकाजमंत्री अनिल परब भाजपच्या बारा सदस्यांना एक वर्षासाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला तो बहुमताने मंजूर झाला.

गिरीश महाजन (Girish Mahajan), अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar), आशिष शेलार (Ashish Shelar), अतुल भातखळकर, संजय कुटे, राम सातपुते, जयकुमार रावळ, नारायण कुचे, किर्तीकुमार बांगडिया, पराग आळवणी, हरिष पिंपळे, योगेश सागर यांना एक वर्षासाठी निलंबित कऱण्यात आले. तसेच त्यांना मुंबई आणि नागपूरच्या विधानभवनाच्या आवारात येण्यास मनाई घातली. 

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजप आणि सत्ताधाऱ्यांत जोरदार चकमक झाली. काही सदस्यांनी डायसवरून माईक हिसकविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सभागृह तहकूब झाले. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या केबिनमध्ये बैठक झाली. तेथे जाधव यांना शिवीगाळ झाली.

या साऱ्या मुद्यांबाबत भास्कर जाधव यांनी सभागृहात निवेदन केले. ते म्हणाले की मराठा आरक्षण, वैधानिक विकास मंडळ असे सर्व महत्वाचे ठराव चर्चा न करता मंजूर करतो. अधिकचे काही मुद्दे टाकायचे असतील तर दोन्ही बाजूंचे मुद्दे ऐकून तो ठराव सभागृह मंजूर करते. ओबीसींच्या आरक्षणाबाबतचा ठरावबाबत असे झाले नाही. भुजबळ यांनी ठराव मांडण्यापूर्वीच विरोधी नेते फडणवीस यांनी त्यास हरकत घेतली. मी त्यांना अडविले नाही. त्यांना बोलू दिले. त्या वेळी काही विरोधी सदस्य वेलमध्ये आले. त्या सदस्यांना मी मागे जायला सांगितले. मात्र फडणवीस यांनी त्यांना मागे जायचे नाही, असे सांगिल्याचे मी स्वतः ऐकले.

विरोधी पक्षनेत्यांचे भाषण पूर्ण शांततेत झाले. विरोधी नेत्यांच्या भाषणाला उत्तर देण्यासाठी भुजबळ उभे राहिले. भुजबळांनी विरोधी नेत्याचे एकाएका मुद्याचे स्पष्टीकरण दिले. फडणवीस यांनी हा राजकीय प्रस्ताव असल्याचे सांगितले. मात्र भुजबळ यांनी हा ठराव नसल्याचे सांगितले. यावर विरोधी पक्षनेत्यांना काही मुद्दे मांडायचे. आशिष शेलार, गिरीश महाजन हे मला मुद्दे मांडण्यासाठी सांगत होते. मात्र या सभागृहात कधी घडले नसेल ते घडले. मी आक्रमक आहे. मला खोटे बोललेल आवडत नाही आणि कोणाला दिलेली वेळ चुकवत नाही. सत्ताधारी पक्षाने दिलेले उत्तर विरोधी पक्षाला मान्य नसते, हे असे ठरलेले असते. म्हणून मी माझा प्रस्ताव मंजूर करत असताना काही सदस्य व्यासपीठावर आले. या सदस्यांनी माझ्या समोरचा माईक ओढला. राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. मला पण नियम कळतात. मी संबंधित सदस्यांना मेम करीन, असा इशारा दिल्याचे जाधव यांनी सांगितले.

``सभागृहात गोंधळाच्या वेळा येतात, ताणतणावाचे प्रश्न येतात. ज्येष्ठ सदस्य त्यांना अडवतात. मात्र सभागृहाचे कामकाज स्थगित झाले की विषय संपतो. मात्र सभागृहाच्या बाहेर गेल्यानंतर कोणी कटुता ठेवत नाही. ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे. आज मी सभागृहातून बाहेर उपाध्यक्षांच्या केबिनमध्ये गेलो. उपाध्यक्षांनी मला त्यांच्याशेजारच्या खुर्चीवर बसण्याचा आग्रह केला. मात्र मी समोर बसलो. त्या वेळी फडणवीस हे रागारागाने आले. ते आले. मी स्वतः खुर्चीवरून उठलो. ते रागावलेले होते. या विरोधी पक्षनेते, असे मी त्यांनी म्हणालो. चंद्रकांतदादांना माझ्याशेजारच्या खुर्चीवर ओढून बसविलो. मात्र फडणवीस हे शांत होण्याच्या परिस्थितीत नव्हते. काही विरोधी सदस्यांनी माझ्या आईबहिणीवून शिव्या दिल्या. काही सदस्यांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. काही गुंड असतात, असे लोकप्रतिनिधी आवरण्याच्या मनःस्थितीत नव्हते. तुम्ही 50-60 एकत्र आले तर मी एकटा असलो तरी पाऊल मागे घेणार नाही. मी अशा प्रसंगाला पाठ दाखविणारा नाही. मी तिथे टिकून बसलो. सभागृहातली आजची परिस्थिती लांच्छनास्पद होता. ओबीसी नेत्याने एखादा विषय विस्तृतपणे मांडला तर त्यावर हरकत काय, असा सवाल जाधव यांनी विचारला. महाराष्ट्राच्या संस्कृतीला हा काळीमा फासला, अशी टीका जाधव यांनी केली.

उपाध्यक्षांच्या केबिनमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे आहेत. अध्यक्षांचे काय अधिकार आहेत हे मी दाखवेन, हे तिथे मी बोललो. मी तिथे शिवीगाळ केली असेल तर तुम्ही द्याल ती शिक्षा सोसायला तयार आहे. मी चूक केलेली नाही. मी शिवीगाळ केलेली नाही. मी आजतागायत असंसदिय शब्द वापरलेला नाही. आजचा दिवस माझ्या आयुष्यातील काळा दिवस आहे. मी कधीही कटुता, शत्रुत्व ठेवलेले नाही. माझ्याबाबती हे घडले. ओबीसींना न्याय देतानाच्या प्रक्रियेत घडले. अशा प्रकारची गुंडगिरी होऊ लागली तर काय वळण घेईल हे सांगता येत नाही. त्यामुळे सरकारने या परिस्थितीत निर्णय घ्यावा, असे आवाहन जाधव यांनी केले. 

 

  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख