सावधान! लॉकडाऊन काळात वाढताहेत सायबर गुन्हे

राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये सायबर गुन्हेगार सुसाट सुटल्याचे चित्र आहे. सायबर गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनीही मोहीम सुरू केली आहे.
cyber frauds are on rise in coronavirus lockdown in maharashtra
cyber frauds are on rise in coronavirus lockdown in maharashtra

मुंबई : राज्यातील लॉकडाउनच्या काळातील परिस्थितीचा काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र सायबर विभागाने कारवाई सुरू केली असून, राज्यात सायबरशी निगडित ४५०  गुन्हे दाखल झाले असून, २३९ व्यक्तींना अटक झाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली आहे. 

राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ४५० गुन्ह्यांची (२७ अदखलापत्र) नोंद ३१ मेपर्यंत झाली आहे. या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने विश्लेषण केले आहे. त्यात असे समोर आले की, आक्षेपार्ह व्हाट्सअॅप मेसेज फॉरवर्ड केल्याप्रकरणी १८६ गुन्हे दाखल झाले आहेत, तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट शेअर केल्याप्रकरणी १८० गुन्हे दाखल झाले आहेत. टिकटॉक व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी २३ गुन्हे दाखल झाले असून, आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी ८ गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच, इन्स्टाग्रामवर चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत. अन्य सोशल मीडियाचा गैरवापर केल्याप्रकरणी ४९ गुन्हे दाखल झाले आहेत. या सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत २३९ आरोपींना अटक केली आहे . याचबरोबर १०७ आक्षेपार्ह पोस्ट काढून टाकण्यात आल्या आहेत. 

सध्या लॉकडाउनच्या काळात अनेकांना नोकरकपातीला सामोरे जावे लागत आहे. बऱ्याच जणांना वेतन कपातीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या काळात बरेच जण नवीन नोकरीसाठी, विविध ऑनलाइन जॉब पोर्टलवर आपली माहिती अपलोड करीत आहेत . यामुळे तुम्हाला नोकरीच्या संदर्भात काही ई-मेल अथवा एसएमएस आला तर सावधपणे त्याची आधी सत्यता पडताळून बघा, असे सायबर विभागने म्हटले आहे. 

भारतातील अनेक लोकांचा विविध जॉब पोर्टलवर अपलोड असलेला डेटा डार्कनेट व इंटरनेटवरील अन्य काळ्याबाजारात सहजपणे उपलब्ध आहे. या डेटाचा गैरफायदा घेऊन नोकरीबाबत प्रयत्नशील असणाऱ्या उमेदवारांना फसविण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी अनेक बनावट लिंक बनविल्या आहेत . त्यामुळे  ज्या कंपनीच्या नावाने तुम्हाला नोकरीची ऑफर आली आहे त्या कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून या ऑफरची खात्री करून घ्या. त्या कंपनीचा काही संपर्क क्रमांक असेल तर तिथे कॉल करून संबंधित विभागाकडून खातरजमा करून घ्या. कोणत्याही ई-मेल अथवा एसएमएसमधील लिंकवर क्लिक करू नका व क्लिक केल्यास त्यावर कुठल्याही प्रकारचे ऑनलाइन आर्थिक व्यवहार करू नका. तुम्हाला पैसे भरा अशी विनंती करणारा कॉल आला तर कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांबरोबर व्यक्तिगत भेटीसाठी आग्रही राहा, असा सल्ला महाराष्ट्र सायबर विभागाने दिला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com