नऊ तासांच्या चौकशीत ईडीने खडसेंना हे सांगितले - Eknath Khadse interrogated by ED for nine hours | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

नऊ तासांच्या चौकशीत ईडीने खडसेंना हे सांगितले

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 8 जुलै 2021

ज्यावेळी चौकशीची गरज भासेल, त्यावेळी आम्ही चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात येऊ, असे खडसेंच्या वतीने सांगण्यात आले आहे.

मुंबई  ः भोसरीतील कथित जमीन गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचनालयाने (ईडी) माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची आज (ता. ८ जुलै) तब्बल नऊ तास चौकशी केली. चौकशीनंतर माध्यमांशी न बोलता खडसे हे आपल्या निवास स्थानाकडे रवाना झाले. दरम्यान, भोसरीतील जमीन व्यवहारासंदर्भातील आणखी काही कागदपत्रे येत्या दहा दिवसांत जमा करण्याचे आदेश ईडीने दिले आहेत, असे खडसे यांच्या वकिलानी माहिती दिली.  (Eknath Khadse interrogated by ED for nine hours)

दरम्यान आज सकाळी ईडी कार्यालयाकडे चौकशी जाताना त्यांनी हे सर्व जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी तसेच राजकीय आकसापोटी, सूडाच्या भावनेतून केले जात असल्याचा आरोप केला होता.

हेही वाचा : नारायण राणेंना पंतप्रधान केले तरी शिवसेनेला कोकणातून हटविणे अशक्य

खडसे यांनी चौकशीच्या दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांना सर्व प्रकारचे सहकार्य केले आहे. भोसरीतील जमीन व्यवहारासंदर्भातील कागदपत्रे येत्या दहा दिवसांत जमा करण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. ज्यावेळी चौकशीची गरज भासेल, त्यावेळी आम्ही चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात येऊ, असे खडसेंच्या वतीने सांगण्यात आले आहे. यापुढे चौकशीसाठी कधी यायचे, हे आता सांगितलेले नाही. या व्यवहाराशी माझा कोणताही संबंध नाही, असे खडसे यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे, असे एकनाथ खडसे यांच्या वकिलाने माध्यमाशी बोलताना नमूद केले.

भोसरीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी दोन दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली होती. परवा रात्रभर त्याची ईडीकडून कसून चौकशी करण्यात आली होती. काल सकाळी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर ईडीने काल खडसे यांना समन्स बजावले होते. सकाळी ईडीच्या कार्यालयात जाताना ईडीला चौकशीत पूर्ण सहकार्य करणार, असे खडसेंनी सांगितले होते. 

खडसे सकाळी काय म्हणाले होते?

भोसरी जमीन व्यवहारात मला जाणीवपूर्वक अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सर्व प्रकरणाला राजकीय वास येतो आहे. या चौकशीच्या हेतूवरच मला संशय आहे. कारण, काही दिवसांपासून जळगाव येथील काही व्हाटस अॅप ग्रुपवर ‘कुछ तो होनेवाला है’ असा मेसेज फिरत होता. याचा अर्थ असा आहे की, जाणीवपूर्वक ही चैाकशी केली जात आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने मला आणि माझ्या परिवाराला छळण्यासाठी विरोधकांचा हा प्रयत्न आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख