पालकमंत्री हसन मुश्रीफांची बाजू मंत्री प्राजक्त तनपुरेंनी सावरली

राज्याचे ग्रामविकास व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आज या तीन अतिवृष्टीत झालेल्या तालुक्यांत नुकसानीची आढावा बैठक घेतली.
पालकमंत्री हसन मुश्रीफांची बाजू मंत्री प्राजक्त तनपुरेंनी सावरली
prajakt tanpure.jpg

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव व नगर तालुक्यात अतिवृष्टी झाली. हे तीनही तालुके दुष्काळी समजले जातात. राज्याचे ग्रामविकास व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आज या तीन अतिवृष्टीत झालेल्या तालुक्यांत नुकसानीची आढावा बैठक घेतली. या बैठकीला आमदार मोनिका राजळे, शेवगाव पंचायत समितीचे सभापती क्षितिज घुले, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील काकडे, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच आदी उपस्थित होते.

या बैठकीत नंतर तनपुरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा अतिवृष्टी भागातील दौरा झालेला नसल्याबाबत विचारले. मुश्रीफ हे 15 ऑगस्टनंतर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले नाहीत. यावर तनपुरेंनी मुश्रीफ यांची पालकमंत्री मुश्रीफ यांची बाजू सावरत म्हणाले, अतिवृष्टी झाल्यावर कॅबिनेटची बैठक होती. या बैठकीनंतर पालकमंत्री मुश्रीफ यांनी मला अतिवृष्टी झालेल्या भागांचा पाहणी दौरा करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार मी त्या भागांचे पाहणी दौरे केले होते. पालकमंत्र्यांचे जिल्ह्यावर पूर्ण लक्ष आहे. ते जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहेत. आगामी शुक्रवारी व शनिवारी ते जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.

हेही वाचा...

पालकमंत्र्यांनी प्रशासन गतिमान ठेवले आहे. त्यांच्या सूचने नुसार दौरा करताना मी परिस्थितीची पाहणी केली. त्यावेळी केंद्राच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या धोरणानुसार निधी मिळवून देण्यासाठीच्या सूचना मी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. कृषी व महसूल अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करून त्या संदर्भातील अर्ज शेतकऱ्यांकडून तातडीने भरून घेण्यास सांगितले होते. त्यामुळे 15 हजार शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेतले आहेत. त्यांना केंद्राच्या आपत्ती व्यवस्थापनानुसार मिळणाऱ्या निधी पेक्षाही जास्त निधी मिळावा यासाठी राज्य सरकार प्रयत्नरत आहे.

या सुमारे एक हजार आपत्तीग्रस्तांना प्रत्येकी तातडीने 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ वाटत करण्यात आले. जनावरे, विहिरी, पिके यांचे मोठे नुकसान झाले आहे. महावितरणाचे विजेचे खांबही कोसळले आहे. यातील काही खांब दलदलीत आहेत. ते सोडून इतर खांब तातडीने बसवून वीज प्रवाह सुरळीत करण्याच्या सूचना महावितरण प्रशासनाला दिल्या होत्या. यात तीन चार ठिकाणी हलगर्जीपणा आढळून आला. संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने काम न झाल्यास कारवाई करण्यात येईल असे बजावले आहे. या पूर्वी श्रीरामपूर तालुक्यात असेच हलगर्जीपणाचे काम आढळून आले होते. तेथे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली होती, असे प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

हेही वाचा...

बावनकुळेच्या काळात होती वीज समस्या 
कॅबिनेटच्या बैठकीत पाणी पुरवठा योजनांचे वीज कनेक्शन तोडण्याचे थांबविण्याचे आदेश दिले आहेत. मागील सरकारच्या काळात ग्रामविकास विभागाने पाणी योजनांचे चौदाव्या, पंधराव्या वित्त आयोगातून पैसे महावितरणाला दिले होते. मात्र त्या पैशांचा बावनकुळे यांच्या काळात योग्य विनियोग झाला नाही. काही ठिकाणी एका ग्रामपंचायतीने पैसे भरले व नावावर मात्र दुसऱ्या ग्रामपंचायतीवर पडले. असे प्रकार झाल्याचे आढळून आले आहे. ऊर्जा विभागातही कोरोना संकटात वसुलीला अडचणी आल्या आहेत. त्यामुळे महानिर्मितीला पैसे देणे थकीत आहे. महानिर्मिती वीज तयार करण्यासाठी कोळसा वापरते तो केंद्र सरकारकडून मिळतो. तेथे पैशासाठी केंद्र सरकार थांबत नाही. तिथे आगाऊ धनादेश दिल्यावरच कोळसा मिळतो. बावनकुळेंच्या काळात या समस्या निर्माण झाल्यामुळे अडचणी येत आहेत.

मी जेव्हा आमदार झालो. तेव्हा डीपी जळाली, बिघडली असे फोन यायला लागले. मी सुरवातीला घाबरलो. आव्हान म्हणून मी ऊर्जा मंत्रालय घेतले आहे. महाविकास आघाडीने कृषी विषयक वीज धोरण आणले त्यासाठी सरपंचांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या बैठका घेतल्या व हे धोरण ठरविले. आम्ही शेतकऱ्यांकडून वसूल होणाऱ्या रकमेतील 33 टक्के भाग ग्राहकाच्या गावावर, 33 टक्के भाग जिल्ह्यावर खर्च करणार आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा विकास होईल. अहमदनगर जिल्ह्यात 10 नवीन सबस्टेशन उभारण्यात येणार आहेत. त्याचे कार्यारंभ आदेश दोन महिन्यात निघतील, असेही तनपुरे यांना सांगितले. 


अधिकारी मंत्र्यांचे नाही कायद्याचे ऐकतात
नगर तालुका बाजार समितीच्या सत्ताधारी संचालकांनी महाविकास आघाडीतील मंत्री पदाचा गैरवापर करून बाजार समितीवर चौकशी व कारवाई करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. यावर मंत्री तनपुरे यांना विचारले असता ते म्हणाले, प्रशासकीय अधिकारी मंत्र्यांचे ऐकून कामे करत नाहीत. त्यांना कायदा व नियम दिसतात. ते कायद्याचे ऐकतात. कायद्यानुसारच कामे करतात, असा टोला तनपुरे यांनी लगावला.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in