ज्योती देवरे यांचा ऑडिओमधील आवाज अंगावर शहारे आणणारा - देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून ज्योती देवरे यांना न्याय द्यावा या मागणीचे पत्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांना आज सायंकाळी पाठविले.
ज्योती देवरे यांचा ऑडिओमधील आवाज अंगावर शहारे आणणारा - देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnvis.jpg

अहमदनगर ः अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील तहसीलदार ज्योती देवरे यांनी केलेले आरोप अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यांची आत्महत्येचा इशारा देणारी ऑडिओ क्लिप, एकूणच प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून ज्योती देवरे यांना न्याय द्यावा या मागणीचे पत्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज सायंकाळी पाठविले. तहसीलदार देवरे यांच्या ऑडिओ क्लिपमध्ये आमदार नीलेश लंके व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांवर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. Jyoti Deore's voice in the audio brings the city to life - Devendra Fadnavis

देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी ११ मिनिटांची एक ऑडिओ क्लिप जारी करून अनेक गंभीर आरोप स्थानिक लोकप्रतिनिधीवर व वरिष्ठ अधिकाऱ्यांवर केले आहेत. लसीकरणावरून काही कर्मचाऱ्यांना पोलिस अधिकाऱ्यांच्या समोर मारहाण करणे, अश्लील शिविगाळ करणे, महिला कर्मचाऱ्यांना मारण्यासाठी महिला पोलिसांना बोलाविण्यास सांगणे, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांपर्यंत प्रकरण नेल्यानंतर तहसीलदार ज्योती देवरे यांच्या बदनामीचा प्रयत्न करणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही त्यांना धमक्या प्राप्त होणे, कोरोना काळात नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न करीत असताना त्यातही अडचणी उत्पन्न करणे, मग थेट मंत्र्यांकडे त्यांच्या बदलीची शिफारस करणे, यातून महिला अधिकाऱ्यांचे खच्चीकरण करणे, असे अनेक गंभीर आरोप त्यांनी केले आहेत.

हेही वाचा...

थेट दीपाली चव्हाण प्रकरणाचा उल्लेख करून मी सुद्धा तुझ्याकडे येतेय, हा त्यांचा ऑडिओमधील आवाज अंगावर शहारे आणणारा आहे. एक स्त्री अधिकारी आपले कर्तव्य पार पाडत असताना संपूर्ण यंत्रणाच तिचे मानसिक खच्चीकरण करीत असेल आणि परिणामी त्या महिला अधिकाऱ्याला आत्महत्येचा इशारा द्यावा लागत असेल तर ही बाब अतिशय गंभीर आणि मनाला वेदना देणारी आहे. खरे तर कोरोना काळात संपूर्ण यंत्रणा दबावात काम करीत असताना त्यांना आणखी नाहक त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाणे अतिशय आवश्यक आहे. माझी आपल्याला विनंती आहे की, आपण यात तत्काळ लक्ष घालून हस्तक्षेप करावा. या महिला अधिकाऱ्याला आपण स्वत: बोलावून घेऊन त्यांची तक्रार ऐकून घ्यावी आणि त्यांच्या व्यथा समजून घ्याव्यात आणि तत्काळ त्यावर तोडगा काढून त्या अधिकाऱ्याला दिलासा द्यावा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात एखाद्या महिला अधिकाऱ्याची इतकी अवहेलना होऊ नये, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in