पुराने घेतला ११ कोरोना रुग्णांचा बळी; रुग्णालयात पाणी घुसून व्हेंटिलेटर पडले बंद - Floods in Chiplun shutdown ventilators, died 11 corona patients-vd83 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

पुराने घेतला ११ कोरोना रुग्णांचा बळी; रुग्णालयात पाणी घुसून व्हेंटिलेटर पडले बंद

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 23 जुलै 2021

अकराही जणांचे मृतदेह अद्याप रुग्णवाहिकेत ठेवण्यात आले आहेत.

चिपळूण : महापुराचे पाणी हॉस्पिटलमध्ये शिरून वीजपुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील कोरोनाचे ११ रुग्ण दगावले आहेत. ही घटना चिपळूणमधील अपरांत हॉस्पिटलमध्ये घडली आहे. (Floods in Chiplun shutdown ventilators, died 11 corona patients)

अपरांत हॉस्पिटलमधील इतर रुग्णांना शहरातीलच कामथे रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपरांत हॉस्पिटलमध्ये तब्बल २१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु होते. पुरेशा सुविधा नसल्याने अकराही जणांचे मृतदेह अद्याप रुग्णवाहिकेत ठेवण्यात आले आहेत.

दरम्यान, गेली चार दिवसांपासून चिपळूण पुराच्या पाण्यात बुडाले आहे. त्याच पुराचे पाणी रुग्णालयात शिरल्याने हॉस्पिटलचा वीजपुरवठा बंद पडला, त्यामुळे व्हेंटिलेटरवरील कोरोनाच्या अकरा रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

हेही वाचा : 24 तासांमध्ये 30 ठिकाणी दरडी कोसळल्या; वरंधा घाट वाहतुकीस बंद

चार दिवसांनंतर आज (ता. २३ जुलै) सकाळी पुराचे पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. पण, शहरात सर्वत्र चिखलाचे साम्रज पसरले आहे. पाणी व इतर सुविधांची वानवा असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.

महापुराचे पाणी हॉस्पिटलमध्ये शिरले आणि वीजपुरवठा बंद झाल्याने व्हेंटीलेटर आणि ऑक्सिजनची सुविधा बंद पडल्या. त्याबाबत मृत रुग्णाच्या एका नातेवाईकाने सांगितले की, माझा भाऊ गेली बारा दिवस अ‍ॅडमीट होता. त्याच्यामध्ये सुधारणाही होत होती. पण, अपरांत रुग्णालयात महापुराचे पाणी शिरले आणि सर्व सुविधा बंद पडल्या, त्यामुळे माझ्या भावाचा मृत्यू झाला. आम्हाला अपेक्षा होती की तो कोरोनातून बरा होईल. पण अव्यवस्थेमुळे माझा भावाचा जीव गेला आहे.  

दुसऱ्या एका नातेवाईकाने सांगितले की माझी मावशी गेली अकरा दिवसांपासून अपरांत रुग्णालयात अ‍ॅडमिट होती. पण, पुराचे पाणी रुग्णालयात शिरल्याने सर्व यंत्रणा बंद पडली आणि माझ्या मावशीचा मृत्यू झाला. केवळ ऑक्सिजनअभावी माझ्या मावशीला जीव गमावावा लागला. तिला दोन दिवसांत डिस्चार्ज मिळणार होता. परंतु महापुराच्या पाण्याने माझ्या मावशीचा बळी घेतला आहे, अशा शब्दांत त्यांनी आपले दुःख व्यक्त केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख