24 तासांमध्ये 30 ठिकाणी दरडी कोसळल्या; वरंधा घाट वाहतुकीस बंद

पुन्हा नव्याने दरडी कोसळत आहेत.
Varndha Ghat closed for travelling
Varndha Ghat closed for travelling

भोर : भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात ता. 21 जुलैपासून मुसळधार पावसाने दरडी कोसळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मागील 24 तासांत या घाटात सुमारे 30 ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. घाट रस्त्यावर वारंवार कोसळणाऱ्या दरडी आणि कोसळलेल्या दरडींचा राडारोडा हटविण्यासाठी 8 दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरंधा घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीकरीता बंद करण्यात आला आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. (Varndha Ghat closed for travelling)

भोरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी गुरुवारी (ता. 22 जुलै) सकाळपासून चार जेसीबीच्या साहाय्याने दरडी हटविण्याचे काम करीत आहेत. परंतु जोराच्या पावसामुळे समोरचे दिसू शकत नाही आणि पुन्हा नव्याने दरडी कोसळत असल्यामुळे काम करण्यास अडथळा निर्माण होत आहेत, अशी माहिती भोरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय वागज यांनी दिली. 

वारवंड येथील दरडी काढण्याचे काम गुरुवारी (ता. २२ जुलै) सायंकाळी सुरू असतानाच शेजारी दुसऱ्या ठिकाणी पुन्हा दरड कोसळल्याने शासकीय गाडीही अडकून पडली आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना रात्रीच्या वेळी सुमारे 10 किलोमीटर अंतर चालत माघारी यावे लागले. त्यानंतर शुक्रवारी (ता. 23 जुलै) सकाळपासून पुन्हा कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, दरडी कोसळणे सुरुच असल्यामुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत. 

वरंधा घाटातील वारवंड येथे 4 ठिकाणी, हिर्डोशी येथे 5 ठिकाणी, शिरगाव येथे 2 ठिकाणी, आशिंपी 2 ठिकाणी, वाघजाई मंदीर शजारी 5 ठिकाणी आणि घाटातील रिंगरोडवरील पऱ्हर खुर्द येथे 4 ठिकाणी आणि कंकवाडी, दापकेघर, कुडली बुद्रूक, कुडली खुर्द येथे प्रत्येकी 2 ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. याशिवाय आणखी बऱ्याच ठिकाणी दरडी कोसळत आहेत. 

उंबार्डेवाडी येथील रस्त्यावर शुक्रवारी सकाळी दरड कोसळल्याने त्याठिकाणी चालत जाणेही अशक्य होऊन बसले आहे. शिरगाव येथील मुख्य धबधब्याच्या ठिकाणीदेखील मोठी दरड कोसळली आहे. त्यामुळे कामासाठी मोठ्या मशिनरी जाणे शक्य नाही. घाटातील रस्ता वाहतुकीकरीता सुरळीत करण्यासाठी 8 दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरंधा घाटातून कोणीही जाऊ नये, यासाठी घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीकरीता बंद करण्यात आला आहे, असे प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com