पावसाचे रौद्ररुप पाहून जयंत पाटील म्हणाले...तातडीने स्थलांतरीत व्हा!

एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. मात्र पाऊस खुप आहे. त्यामुळे काठावरच्या गावांनी परिस्थिती बिघडण्याच्या आत बाहेर पडावे.
पावसाचे रौद्ररुप पाहून जयंत पाटील म्हणाले...तातडीने स्थलांतरीत व्हा!
Water Resources Minister Jayant Patil's appeal to the citizens.jpg

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून राज्यभरात जोरदार पाऊस सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे कृष्णा खोऱ्यातील परिस्थिती तीव्र आणि गंभीर होत चालली आहे. प्रशासनाने कालपासूनच सुरक्षिततेच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. मात्र, काळजी म्हणून नेहमी संकटात असणाऱ्या गावांनी आपली जनावरे, महत्त्वाच्या वस्तू घेऊन स्थलांतरीत व्हावे असे, आवाहन जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी जनतेला केले आहे. (Water Resources Minister Jayant Patil's appeal to the citizens)  

आपल्या सर्वांची मोठी आबाळ होईल पण निसर्गापुढे आपण काहीच करू शकत नाही, अशी भावनिक साद पाटील यांनी नागरिकांना घातली आहे. सांगलीतही परिस्थिती गंभीर होत चालली आहे. लोकप्रतिनिधी, सरपंच, यंत्रणेने ताबडतोब हालचाली कराव्यात. शिवाय तेथील प्रशासनालाही सूचना दिल्या आहेत. जलसंपदा विभाग धरणांच्या पाण्याच्या विसर्गावर नियंत्रण ठेवून आहे. तसेच कर्नाटक सरकारशी संपर्कात आहोत. शिवाय प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या सातत्याने संपर्कात असल्याचा धीरही मंत्री जयंत पाटील यांनी जनतेला दिला आहे. 

एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. मात्र पाऊस खुप आहे. त्यामुळे काठावरच्या गावांनी परिस्थिती बिघडण्याच्या आत बाहेर पडावे. पश्चिम महाराष्ट्राने अशी अनेक संकट पाहिली आहेत. आपण या संकटालाही तोंड देऊ असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील २०१९ चा पूर आठवला की अनेकांना झोप लागत नाही. मागच्या काही दिवसापासून पश्चिम महाराष्ट्रात त्याच तीव्रतेचा पाऊस पडत आहे, आणि पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. मागचा अनुभव लक्षात घेता नागरिकांचे अधिक नुकसान होऊ नये. यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत, असेही पाटील यांनी सांगितले आहे. 

दरम्यान, या जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफ, तटरक्षक दल, नौदल तसेच सैन्य दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पूरपरिस्थितीत मदत व बचावकार्य करण्यासाठी शासनाकडून तत्काळ उपाययोजना सुरू आहेत. या परिस्थितीत पोलिस प्रशासनाने सतर्क व दक्ष राहावे, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत. 

राज्यात कोकण आणि मध्यमहाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी शुक्रवारी देखील जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून आज (ता. 23 जुलै) रोजी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाकडून मुंबईत जोरदार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक, औरंगाबाद, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला आणि नागपूर या जिल्ह्यांत सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे.

Edited By - Amol Jaybhaye

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in