पुणे : पुण्यामध्ये पु्न्हा कोरोना डोकं वर काढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोनारुग्ण संख्येत वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात ४.६ टक्के इतका पॉझिटिव्हीटी दर आता १२.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे पु्न्हा कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी महानगरपालितेच्या वतीने आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, आयुक्तांसह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.
कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर शहरातील लाॅकडाऊन उठवण्यात आले होते. सध्या कोणतेही निर्बंध नव्याने लागू करण्याचा महापालिकेचा विचार नसला, तरी मोठी खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. शिवाय चार वॉर्ड ऑफीस परिसरात कंटेन्मेंट झोनचा विचारही महापालिका बैठकीत करण्यात आला आहे.
कोरोना रोखण्यासाठी मुंबईच्या लोकमध्ये 'मार्शल्स'
पुणे शहरात मंगळवारी (ता १६ फेब्रुवारी) नव्याने ३०९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या आता १ लाख ९५ हजार ४९६ इतकी झाली आहे. शहरातील २७२ कोरोनाबाधितांना काल डिस्चार्ज देण्यात आला असून शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या १ लाख ८८ हजार ९७५ झाली आहे.
शहरात काल २ हजार ६२० नमुने घेण्यात आले आहेत. शहराची एकूण टेस्ट संख्या आता १० लाख ७६ हजार ८११ इतकी झाली आहे. तर सध्या शहरात उपचार घेणाऱ्या १ हजार ७१९ रुग्णांपैकी १४२ रुग्ण गंभीर, तर २७८ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. शहरात उपचार घेणाऱ्या १ हजार ७१९ रुग्णांपैकी १४२ रुग्ण गंभीर तर २७८ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.
कंटेन्मेंट सुरु करण्याचा विचार...
सिंहगड रोड, नगर रोड, बिबवेवाडी आणि वारजे क्षेत्रीय कार्यालय परिसरात संसर्ग वाढतोय. संसर्ग वाढला तर पुन्हा कंटेन्मेंट झोन सुरु करण्याचा विचार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले. कोरोना रुग्णांची संख्या वाढली तर त्यासाठी तयारी म्हणून नव्याने अँटिजेनटेस्ट किट खरेदी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. चार वॉर्ड ऑफीस परिसरात नव्याने कलेक्शन सेंटर सुरु केली जाणार आहेत.
लाॅकडाऊन पाहिजे की, थोड्या निर्बंधासह मोकळेपणाने रहायचे जनतेने ठरवावे..
आरोग्य विभागाला पुन्हा अतिरिक्त मनुष्यबळ पुरवले जाणार आहे. सर्व प्रकारचे १ हजार १६३ शासकीय बेड्स सज्ज ठेवण्यात येणार आहेत. खासगी रुग्णालयांना कोरोनाचे अतिरिक्त बेड्स उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या गेल्यात. मास्कसंदर्भातील कारवाईची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जाणार, असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.
Edited By - Amol Jaybhaye

