लाॅकडाऊन पाहिजे की, थोड्या निर्बंधासह मोकळेपणाने रहायचे जनतेने ठरवावे.. - The lockdown is that the people should decide to live freely- CM thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

लाॅकडाऊन पाहिजे की, थोड्या निर्बंधासह मोकळेपणाने रहायचे जनतेने ठरवावे..

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

लोकांच्या गाठीभेटी, पार्ट्या व इतर सामाजिक कार्यक्रम कुठल्याही आरोग्याच्या नियमविना होतांना दिसतात. उपाहारगृह, हॉटेल्सच्या वेळा आपण वाढविल्या आहेत मात्र नियमांचे पालन होतांना दिसत नाही. स्थानिक प्रशासनाच्या पथकांनी अशा सर्व ठिकाणी भेटी देऊन तत्काळ कारवाई केली पाहिजे.

मुंबई ः राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. परिस्थीती पुन्हा हाताबाहेर जाऊ नये याची खबरदारी घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्यातील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. लॉकडाऊन पाहिजे की काही थोड्या निर्बंधांसह मोकळेपणाने राहायचे हे जनतेने ठरवावे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी लोक नियम पाळत नसल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली.

या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कोरोनाची परिस्थीती आणि आरोग्य, वैद्यकीय, पोलीस, प्रशासनाच्या तयारीचा फेरआढावा घेतला. हा आढावा घेतांनाच त्यांनी कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही दिले. मुख्यमंत्री म्हणाले, लोक मास्क घालत नाहीत किंवा आरोग्याचे नियम पाळत नसतील तर जिल्हा आणि पोलीस प्रशासनावर हे नियम काटेकोरपणे अंमलात आणण्याची जबाबदारी आहे, त्यांनी अजिबात शिथिलता न दाखवता कडक दंडात्मक व आवश्यक कारवाई केलीच पाहिजे.

कोरोनाचा संसर्ग वाढत असेल त्या भागात  किंवा परिसरात टार्गेटेड पद्धतीने तपासण्या करा, एकेका रुग्णांचे किमान २० तरी संपर्क शोधलेच पाहिजेत. सर्व काही व्यवहार सुरू झाले आहेत, निर्बंध शिथिल केले आहेत त्यामुळे तरुण वर्ग घराबाहेर पडला आहे. त्यात जणू काही कोरोना संपला असे सगळे वागत आहेत, परिणामतः आपल्याच घरातील वृद्ध व ज्येष्ठ नागरिकांना आपण धोक्यात आणतो आहोत.

मधल्या काळात आपण माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबवून राज्याचा आरोग्य नकाशा तयार केला. यातील सह व्याधी रुग्णांची परत आरोग्य कर्मचाऱ्यांनी विचारपूस सुरू करावी. ज्या ज्या व्यावसायिक संस्था, संघटना लॉक डाऊन उठविण्यासाठी आपणाकडे येत होत्या त्या सर्व संबंधित संस्था, संघटना यांच्याशी परत एकदा बोलून एसओपीची काटेकोर अंमलबजावणी होईल याची खात्री करून घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्या.

नियम न पाळणाऱ्यांची हयगय नको..

 जिथे कंटेनमेंट आवश्यक आहे तिथे ते करा व त्याची अंमलबजावणी करा.  गेले वर्षभर आपण कोरोनाशी लढतांना विविध क्षेत्रांसाठी नियम ( एसओपी) ठरविली आहे, मात्र त्याची अंमलबजावणी होतांना दिसत नाही हे गंभीर आहे.  विशेषतः इतके दिवस थांबलेले लग्न समारंभ सुरू झाले आहेत, लोकांच्या गाठीभेटी, पार्ट्या व इतर सामाजिक कार्यक्रम कुठल्याही आरोग्याच्या नियमविना होतांना दिसतात. उपाहारगृह, हॉटेल्सच्या वेळा आपण वाढविल्या आहेत मात्र नियमांचे पालन होतांना दिसत नाही. स्थानिक प्रशासनाच्या पथकांनी अशा सर्व ठिकाणी भेटी देऊन तत्काळ कारवाई केली पाहिजे.

ज्या विवाह किंवा इतर समारंभात मास्क व इतर नियम पाळलेले दिसणार नाहीत त्या हॉल्स किंवा सभागृहांवर परवाने रद्द करण्याची कडक कारवाई प्रसंगी केली पाहिजे.लोकांमध्ये बेफिकिरी आली असली तरी स्थानिक प्रशासन व पोलिसांत कर्तव्यात ढिलाई नको. सार्वजनिक ठिकाणी पालिकांनी जंतुनाशक फवारणी नियमित करणे सुरू करावी.

गावागावात जाऊन फिरत्या वाहनाद्वारे लोकांच्या चाचण्या वाढवा. ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या फिल्ड हॉस्पिटलमधील सर्व यंत्रणा व्यवस्थित सुरू आहेत का याची खात्री करा. ही सुविधा वापरण्याची वेळ येऊ नये पण तयारीत राहा, अशा सूचनाही उद्धव ठाकरे यांनी विभागीय आयुक्त व इतर अधिकाऱ्यांना दिल्या.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख