फडणवीसांची ती बैठक पुण्याच्या विकासासाठी नव्हे तर...! शिवसेनेचा भाजपला टोला - Shivsena Leader Sanjay More Slams Pune BJP Over city devlopment | Politics Marathi News - Sarkarnama

फडणवीसांची ती बैठक पुण्याच्या विकासासाठी नव्हे तर...! शिवसेनेचा भाजपला टोला

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021

शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी फडणवीसांच्या आढावा बैठकीवर टीका केली आहे.

पुणे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे महापालिकेत येऊन  विविध विकासाकामांचा आढावा घेतला. त्यावरून शिवसेनेने भाजपवर टीका केली आहे. फडणवीसांची ही बैठक पुण्याच्या विकासासाठी नव्हती तर भाजपात सुरू असलेल्या अंतर्गत वादाच्या समन्वयाची असल्याची टोला शिवसेनेने लगावला आहे. 

शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी फडणवीसांच्या आढावा बैठकीवर टीका केली आहे. ते म्हणाले, भाजपाला चार वर्षांमध्ये शहराचा विकास करता आलेला नाही.  भाजपात अंतर्गत संघर्ष असल्याने त्याचा फटका विकास कामांना बसला  आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांच्या आढावा बैठकीनंतरही विरोधी पक्ष नेत्यांना पालिकेमध्ये येऊन बैठक घ्यावी लागते. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष पुण्यात असूनही महापालिकेत फिरकले नाहीत. भाजपाचे अनेक नगरसेवक महाविकास आघाडीच्या संपर्कात आहेत. यामुळे ही बैठक विकासकामांच्या संदर्भातली नसून भाजपा अंतर्गत वादाच्या समन्वयाची असल्याचे म्हणावे लागेल.

हेही वाचा : महापालिकेतच नगरसेविकांमध्ये जुंपली, एकीने मारले थोबाडीत...

केंद्रीय मंञी प्रकाश जावडेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील, खासदार गिरीष बापट आणि सहा आमदार, पालिकेत एकहाती सत्ता आणि ९८ नगरसेवक आहेत. तरीही फडणवीस यांना पालिकेत येऊन प्रकल्पाचा आढावा घ्यावा लागतो हे एक प्रकारे भाजपचे अपयश म्हणावे लागेल. महापालिका निवडणुक एक वर्षावर येऊन ठेपल्यामुळे भाजपला विकास कामाबाबत जाग आली आहे. चार वर्षात एकही प्रकल्प पुर्ण झाला नाही, अशी टीका मोरे यांनी केली.  

 पुण्यातील २४ तास पाणीपुरवठा योजना भाजपा नगरसेवकांमुळे अडली असल्याचे सांगत मोरे म्हणाले, ठेकेदारांना काम करू द्यायचे नाही, लाईन टाकण्याकरता खोदाई करताना अडवणूक करायची, ठेकेदारांना त्रास देऊन दमदाटी करणे यामुळे हे काम रखडले आहे. नदी सुधार कामाला अद्यापी सुरुवात नाही. जनतेच्या पैशांचा अपव्यय होत आहे. सहा मीटर रस्त्याचे रंदीकरण करुन नऊ मीटर रस्ते करणे मोजक्या बिल्डरांचा फायदा होण्यासाठी घाट घातला आहे. या निर्णयामुळे लोकांची घरे बाधित होऊन लोकांना रस्त्यावर यायची वेळ भाजपने आणली आहे. 

कोविडच्या काळात केलेला बेसुमार मनमानी खर्च व त्यातून झालेला भ्रष्टाचार यावरुन भाजप मध्ये खदखद आहे. पालिकेतील भाजपा सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी सारख्या योजनांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचारावरून नागरिकांमध्ये असंतोष आहे. स्मार्ट सिटीचे काम नऊ महिन्यांपासून महिन्यापासून बंद अवस्थेत आहे, असे सांगत मोरे यांनी भाजपच्या अपयशाचा पाढाच वाचला.

Edited By Rajanand More
  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख