कोटा : महापालिकेच्या सभागृहात विविध विषयांवरून नगरसेवक आमनेसामने येतात. अनेकदा वाद शिगेला पोहचून प्रकरण हाणामारीपर्यंत पोहचते. याचाच प्रत्यय एका महापालिकेच्या सभागृहात आला. महापालिकेच्या बजेटवर चर्चा होत असताना अचानक काँग्रेस व भाजपच्या नगरसेविका आमनेसामने आल्या. या गोंधळातच काँग्रेस नगरसेविकेने भाजप नगरसेविकेच्या थोबाडीत मारली. त्यानंतर दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांमध्ये चांगली जुंपली.
राजस्थानमधील कोटा महापालिकेच्या बजेटवर चर्चेदरम्यान हा राडा झाला. सभागृहात भाजपचे नगरसेवक सफाई व्यवस्थेवरून विरोध करत होते. त्यांना यावर पालिका अधिकाऱ्यांकडून उत्तर हवे होते. पण त्याचवेळी काँग्रेस नगरसेवक उत्तर देण्यास उठले. याविरोधात अपक्ष नगरसेवक राकेश पुटरा हे थेट महापौरांसमोर जाऊन उभे राहिले. त्यांच्यामागे भाजपचे नगरसेवकही तिथे पोहचले.
हेही वाचा : उपमुख्यमंत्री अजित पवार गोपीचंद पडळकरांवर भडकले...
काँग्रेसच्या नगरसेवकांनीही महापौरांसमोर येत घोषणाबाजी सुरू केली. यावरून दोन्ही बाजूच्या नगरसेविकांमध्ये वाद सुरू झाला. काँग्रेस नगरसेविका हेमलता आणि भाजपच्या संतोष बैरवा यांच्यामध्ये थेट भांडणाला सुरूवात झाली.
या वादात हेमलता यांनी बैरवा यांच्या थोबाडीत मारली. या प्रकारामुळे चिडलेल्या बैरवा यांनी महापौरांसमोरील कुंडी उचलून हेमलता यांच्या दिशेने फेकली. इतर नगरसेविकांनी दोघींना सावरले. जवळपास अर्धा तास हा प्रकार सुरू होता.
या घटनेनंतर भाजप नगरसेवक चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी महापौरांसमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. बैरवा यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. नगरसेवकांनी जातीवाचक शब्द वापरून मला अपमानित केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
त्यानंतर भाजप नगरसेवक शहराध्यक्ष कृष्ण कुमार सोनी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस महानिरीक्षक रवि दत्त गौड यांच्याकडे तक्रार घेऊन गेले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान, हेमलता यांनी थोबाडीत मारली नसल्याचा दावा केला आहे. काँग्रेसकडूनही पोलिसांना भाजप नगरसेवकांवर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन दिले.
Edited By Rajanand More

