पवार मिश्‍किलपणे म्हणाले; असे उद्योग मी अनेक वर्षे केलेत 

रष्ट्रवादीच्या नव्या शहर कार्यालयास पवार यांनी आज भेट दिली.
pawar.jpeg
pawar.jpeg

पुणे : भारतीय जनता पार्टीच्या विरोधात देशव्यापी आघाडी स्थापन झाली तरी आपण त्याचे नेतृत्व करणार नाही, असे स्पष्ट करीत मी असे उद्योग अनेक वर्षे केल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज मिश्‍किलपणे सांगितले.आघाडीत एकत्र येणाऱ्या नेत्यांना मदत, मार्गदर्शन करून त्यांना शक्ती देण्याचे काम आपण करणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

रष्ट्रवादीच्या नव्या शहर कार्यालयास पवार यांनी आज भेट दिली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना पवार यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्‍नांना उत्तरे दिली.

देशात भाजपा विरोधात पर्यायी शक्ती उभी करावयाची झाल्यास काँग्रेसला सोबत घ्यावे लागेल. कॉंग्रेसशिवाय शक्तीशाली आघाडी होऊ शकणार नाही, असे पवार यांनी सांगितले. प्रशांत किशोर तसेच दिल्लीत झोल्या बैठकीबाबत माध्यमातून खूप चर्चा होत आहे. वास्तविक ही प्रक्रिया गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे. दिल्लीत गेल्या महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनातून काही मार्ग निघू शकतो का यासाठी या बैठका होत आहेत, असे पवार यांनी स्पष्ट केले.

चार दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या राष्ट्रमंचच्या बैठकीत काँग्रेसचे नेते उपस्थित नसल्याने बिगर काँग्रेस आघाडी तयार होत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या पाश्‍र्वभूमीवर पवार यांच्या आजच्या स्पष्टीकरणाला विशेष महत्व आहे.

या विषयी अधिक बोलताना पवार म्हणाले, ‘‘ दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू असताना त्यामध्ये राजकीय पक्ष बाजूला आहेत. मात्र, देशातल्या महत्त्वाच्या प्रश्‍नावर आंदोलन सुरू असताना शेतकऱ्यांना संरक्षण दिले पाहिजे यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून चर्चा सरू आहे. केंद्र सरकारला सूचना केल्या जातील, संसदेत आवाज देखील उठवला जाईल. यासाठी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून चर्चा सुरू आहे. आता आम्ही आघाडी म्हणून बसलो नाही, पण पर्यायी शक्ती उभी करायची असेल तर ती काँग्रेसला बरोबर घेऊनच करण्याची गरज आहे, असे माझे मत आहे.

आघाडीचा चेहरा कोण असावा यावर सध्या आम्ही चर्चा केलेली नाही. पण मला वाटते सामूहिक नेतृत्वाचे सूत्र पुढे येईल. देशात आज लोकांना काही पर्याय असावा अशी जनतेची इच्छा आहे, ती पूर्ण करण्याची जबाबदारी राजकीय नेतृत्वाची असते. ती आम्हाला निश्चितपणे करावी लागेल.’’

सरकारने जम्मू कश्‍मीरचा काढलेला राज्याचा दर्जा पुन्हा देण्याचा निर्णय घेतला, त्याचे स्वागत केले पाहिजे. नेहरू पंतप्रधान असताना हा दिलेला दर्जा या सरकारने काढून घेतला होता. त्याचे परिणाम वाईट होतील असं आम्ही तेव्हाच सांगितलं होतं. पण तरीही निर्णय आडमुठेपणाने घेतला. दीड-दोन वर्षांनी सरकारला उपरती झाली आहे. काश्मीरमधील नेत्यांच्या या बैठकीचेही स्वागत आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.
Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com