मंगलदास बांदलांची १४ दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर येरवडा कारागृहात रवानगी  - Mangaldas Bandal remanded in judicial custody after 14 days in police custody | Politics Marathi News - Sarkarnama

मंगलदास बांदलांची १४ दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर येरवडा कारागृहात रवानगी 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 8 जून 2021

बांदल यांनाही वरील पाच संशयित आरोपी अटक होईपर्यंत जामीन मिळेल, अशी शक्यता तूर्तास तरी दिसत नाही.

शिक्रापूर (जि. पुणे) : पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना अखेर शिरूर न्यायालयाने आज (ता. ८ जून) न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्यांची तब्बल १४ दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर आज येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी झाली आहे. (Mangaldas Bandal remanded in judicial custody after 14 days in police custody)

दत्तात्रये मांढरे, शिवाजीराव भोसले सहकारी बॅंक आणि रवींद्र सातपुते यांच्या फिर्यादीवरुन दाखल सलग तीन गुन्ह्यांच्या प्रकरणात बांदल यांना तब्बल १४ दिवस पोलिस कोठडीत राहावे लागले होते.

हेही वाचा ः काँग्रेस-राष्ट्रवादीचे वाजले : महापौरांविरोधात नगरसेवकांची विश्वजित कदमांकडे तक्रार

शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील दत्तात्रय मांढरे यांच्या तक्रारीवरुन बांदल यांना ता. २६ मे रोजी शिक्रापूर पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यात त्यांना १ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. ही पोलिस कोठडी पूर्ण होत नाही, तोच त्यांच्यावर मंदार पवार विरुध्द कृष्णा विरोळे यांच्या दाखल प्रकरणात शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेने तक्रार दाखल केली. त्या गुन्ह्यात बांदल यांना तीन जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली गेली. या प्रकरणाचा तपास चालू असतानाच त्यांच्यावर पुन्हा रवींद्र सातपुते यांनी तक्रार दाखल केल्याने बांदलांना आजपर्यंत (ता. ८ जून) पोलिस कोठडीत राहावे लागले होते. 

दरम्यान, मंगलदास बांदल यांच्यावर तीन आठवड्यांपूर्वी दाखल पाणीचोरीच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळालेला आहे. बांदल यांना तीनही गुन्ह्यांत आता शिरुर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, त्यामुळे त्यांची आज येरवडा कारागृहात रवानगी झाल्याची माहिती शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली. 

याबाबत शिक्रापूर पोलिसांनी सांगितले की, मंगलदास बांदल यांच्यावर दाखल तीनही गुन्ह्यांतील इतर पाच संशयित आरोपींना अद्यापही अटक झालेले नाहीत. त्यामुळे बांदलांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतरही वरील पाच संशयित आरोपींना अटक करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शिवाय, बांदल यांनाही वरील पाच संशयित आरोपी अटक होईपर्यंत जामीन मिळेल, अशी शक्यता तूर्तास तरी दिसत नाही.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख