पंचायत समिती सदस्यांवर हल्ला करणारे खेडचे सभापती पोखरकरांना अटक

पोखरकर यांचा भाऊ जालिंदर पोखरकर याने पिस्तूलातून हवेत गोळीबार केल्याचा आरोप आहे.
Khed Panchayat Samiti sabhapati Bhagwan Pokharkar arrested
Khed Panchayat Samiti sabhapati Bhagwan Pokharkar arrested

पुणे : अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर डोणजे येथील रिसॉर्टमध्ये घुसून शिवसेनेच्या खेड पंचायत समिती सदस्य व त्यांच्या पतीवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर व त्यांचे सहकारी पंचायत समिती सदस्याचे पती केशव अरगडे यांना पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. पोखरकर यांनी आपल्या पक्षाच्या सहकाऱ्यावर हल्ला करून गोळीबार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.  (Khed Panchayat Samiti sabhapati Bhagwan Pokharkar arrested)

प्रसाद दशरथ काळे (रा. गोलेगाव, ता. खेड) यांनी या प्रकरणी हवेली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरुन भगवान नारायण पोखरकर, जालिंदर नारायण पोखरकर, केशव आरगडे यांच्यासह 15 ते 20 जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगून गोळीबार करणे, विनयभंग, अपहरण, हॉटेलमध्ये जबरदस्तीने घुसून तोडफोड करणे असे गुन्हे दाखल केले आहेत. 

भगवान पोखरकर यांनी ठरलेला कार्यकाळ संपल्यानंतरही खेड पंचायत समितीच्या सभापतीपदाचा राजीनामा दिला नव्हता. त्यामुळे पोखरकर यांच्याविरोधात शिवसेनेच्याच सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला हेाता. शिवसेनेच्या सदस्या सुनीता सांडभोर ह्या अविश्वास ठरावाच्या सूचक आहेत. ठरावावर एकूण १४ पैकी ११ सदस्यांच्या सह्या आहेत. त्यात शिवसेनेचे ६, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ४ आणि भाजपचे एकमेव सदस्य व विद्यमान उपसभापती चांगदेव शिवेकर यांचा समावेश आहे. अविश्वास ठराव दाखल करून हे सर्व ११ जण अज्ञातस्थळी रवाना झाले होते.  

आपल्याच पक्षाच्या सदस्यांनी आपल्यावर अविश्वास आल्यामुळे चिडलेल्या सभापतींनी हे ११ सदस्यांचे अज्ञातस्थळ शोधून काढले. हे सर्वजण हवेली तालुक्यातील डोणजे येथील एका रिसॉर्टवर थांबलेले होते. हे रिसॉर्टही खेड तालुक्यातील बड्या राजकीय हस्तीचेच आहे. तेथे स्वतः सभापती भगवान पोखरकर, त्यांचा भाऊ व त्यांच्या समर्थकांनी महिला सदस्यांना व त्यांच्याबरोबर असलेल्या काही जणींच्या पतींना जबर मारहाण केली. पोखरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याची ही दृश्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्येही कैद झाली आहेत. पोखरकर यांचा भाऊ जालिंदर पोखरकर याने पिस्तूलातून हवेत गोळीबार केल्याचा आरोप  आहे. 

पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अतिरीक्त पोलिस अधिक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या सूचना केली होती. त्यानुसार हवेली पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून समांतर तपास सुरू होता. 

दरम्यान, सभापती भगवान पोखरकर व केशव अरगडे हे दोघेही पुण्यातील शिवाजीनगर येथील मंगला चित्रपटगृहाजवळ येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलिस उपनिरीक्षक रामेश्‍वर धोंडगे, पोलिस कर्मचारी सचिन गायकवाड, गुरू जाधव, अमोल शेडगे आदीच्या पथकाने मंगला चित्रपटगृहाजवळ सापळा रचून दोघांना अटक केली. त्यांना पुढील तपासासाठी हवेली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com