शिवसेना सदस्यांचे बंड : पंचायत समिती सभापतीविरोधात अविश्वास ठराव

आपसात ठरलेली तडजोड पाळून राजीनामा न दिल्यामुळेच त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाल्याची चर्चा आहे.
शिवसेना सदस्यांचे बंड : पंचायत समिती सभापतीविरोधात अविश्वास ठराव
Filed no-confidence motion against Khed Panchayat Samiti sabhapati

राजगुरूनगर (जि. पुणे) : खेड ( Khed) पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर (Bhagwan Pokharkar) यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. ठरावावर मतदान घेण्यासाठी ३१ मे रोजी पंचायत समिती सदस्यांची सभा बोलाविण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण यांना पीठासीन अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. शिवसेनेचे (Shiv Sena) सभापती असलेल्या पोखरकरांविरोधात शिवसेनेच्याच सदस्यांनी बंडाचा पवित्रा घेतला असून, अन्य पक्षाच्या सदस्यांनीही त्यांना पाठींबा दिला आहे. (Filed no-confidence motion against Khed Panchayat Samiti sabhapati)

शिवसेनेच्या सदस्या सुनीता सांडभोर या अविश्वास ठरावाच्या सूचक आहेत. त्यावर एकूण १४ पैकी ११ सदस्यांच्या सह्या आहेत, असे समजते. ते सर्वजण सहलीवर गेले आहेत. खेड पंचायत समितीत शिवसेनेचे ८ सदस्य आहेत. त्यांना कॉंग्रेसच्या एका व भाजपच्या एका सदस्याने आजपर्यंत पाठिंबा दिलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सभागृहात ४ सदस्य आहेत. म्हणजेच शिवसेनकडे पूर्ण बहुमत असतानादेखील सभापतींवर अविश्वास ठराव दाखल झाला आहे. आपसात ठरलेली तडजोड पाळून राजीनामा न दिल्यामुळेच त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाल्याची चर्चा आहे. 


सर्वाना सभापती व उपसभापतिपदाची संधी मिळाली पाहिजे, असे सदस्यांमध्ये आपसात ठरले होते, त्याप्रमाणे न झाल्याने हा ठराव दाखल करण्यात आला आहे. मात्र, यामुळे शिवसेनेतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. शिवसेना नेत्यांचा सदस्यांवर वचक राहिलेला नाही. मागील सभापती, उपसभापती निवडणुकांमध्येही शिवसेनेतील काही सदस्यांनी वेगळी भूमिका घेतलेली होती. या मतभेदांचा फायदा घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी बंडखोरांना पाठिंबा दिला आहे.

वरिष्ठच प्रतिक्रिया देतील

आताच या विषयावर प्रतिक्रिया देणार नाही. कारण, हा विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलेला आहे. त्यामुळे पक्षाचे वरिष्ठच याबाबत प्रतिक्रिया देतील किंवा आम्हाला काहीतरी आदेश देतील, असे शिवसेनेचे खेड तालुकाप्रमुख रामदास धनवटे यांनी सांगितले. 
 
शिवसेनेचा व्हीप सदस्यांवर बंधनकारक राहणार का ?

अविश्वास ठरावामागे तालुक्यातील मोठ्या नेत्याचा हात आहे. आता अविश्वास ठरावावर सह्या करणारे शिवसेनेचे सदस्य यापुढील काळात शिवसेनेत राहणार नाहीत, असा कयास आहे. निवडणुकीला अवघे आठ ते दहाच महिने राहिलेले असल्याने त्यांना कारवाईची चिंता नाही. तसेच, शिवसेनेने निवडणूक झाल्या झाल्या आपला गट जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदविला नसल्याने शिवसेनेचा व्हीप सदस्यांवर कायद्याने बंधनकारक राहणार नाही, असे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Related Stories

No stories found.