गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची आंबेगावसाठी मोठी भेट ! - Approval of Rs. 40 crore for police station building and staff accommodation in Ambegaon | Politics Marathi News - Sarkarnama

गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची आंबेगावसाठी मोठी भेट !

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 5 जुलै 2021

ही तीनही कामे राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनच केली जाणार आहेत.

पुणे  ः आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे पोलिस स्टेशनसाठी स्वतंत्र आणि स्वतःच्या मालकीची इमारत उभारणे. तसेच, घोडेगाव आणि मंचर येथे पोलिस कर्मचाऱ्यांसाठी निवास स्थाने बांधण्यासाठी एकूण ४० कोटी ३८ लाख  इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यापैकी ८ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने  मंजूर केला आहे. राज्याचे गृहमंत्री आणि आंबेगावचे लोकप्रतिनिधी दिलीप वळसे पाटील यांनी याबाबतची माहिती ट्विट करून दिली आहे. (Approval of Rs. 40 crore for police station building and staff accommodation in Ambegaon)

दरम्यान, गृहमंत्री झाल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी या कामाच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघासाठी म्हणजे आंबेगावसाठी पहिलीच मोठी भेट दिल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. 

हेही वाचा : ‘मळगंगे'च्या कुंडावर राष्ट्रवादीच्या संचालकांची ‘विभागीय अस्मिता’ पुन्हा जागी झाली

मंचर पोलिस स्टेशन हे गेल्या काही वर्षांपासून भाडेतत्वावर असलेल्या इमारतीत होते. आता या पोलिस स्टेशनला हक्काची इमारत मिळणार आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी राज्य सरकारच्या वतीने एकूण ११ कोटी ५१ लाख इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. लवकरच या बांधकामाच्या इमारतीचे काम सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 

पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या निवासस्थानाची सद्यस्थिती लक्षात घेऊन मंचर येथील पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्याकरीता निवासस्थाने बांधण्यासाठी अनुक्रमे १४ कोटी ८१ लाख रुपये, तर घोडेगाव येथील पोलिस अधिकारी आणि कर्मचारी निवासाच्या इमारतींचे बांधकाम करण्यासाठी १४ कोटी ६ लाख रुपये इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

या कामांसाठी सध्या ८ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ही वरील तीनही कामे राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनच केली जाणार आहेत. बांधकामाचा नमुना नकाशा, मांडणी आणि विस्तृत नकाशा यांची वास्तुशास्त्र तज्ज्ञाकडून मंजुरी घेऊनच काम सुरु केले जाणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख