सर्वपक्षीय नेत्यांना शिक्रापुरी झटका दाखविणारे पहिलवान बांदल पोलिसी खाक्याने चितपट 

म्हणून अजितदादाही बांदलांपासून चार हात लांबत राहत असल्याची चर्चा आहे.
Pune ZP Former sabhapati Mangaldas Bandal harassed by police action
Pune ZP Former sabhapati Mangaldas Bandal harassed by police action

शिक्रापूर (जि. पुणे) : शिरूर तालुक्याच्या राजकारणात नानाविध कारणांमुळे तब्बल १६ वर्षे चर्चेत राहिलेला पहिलवान बबड्या ऊर्फ मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) सध्या चांगलेच अडचणीत सापडले आहेत. जिल्हा परिषद, विधानसभा ते लोकसभेसाठी शड्डू ठोकून त्यांनी भल्या-भल्यांना घाम फोडला. मात्र सध्याच्या पोलिस कारवाईमुळे हा पहिलवान पुरता चितपट झाला असून सलग 14 दिवसांच्या पोलिस कोठडीने ते हैराण झाले आहेत. (Police action agaianst Mangaldas Bandal)

शिरूरचे विद्यमान आमदार अशोक पवार यांच्याशी घेतलेला पंगाही बांदलांना चांगलाच नडला आहे. आमदारांच्या मर्जीतील पोलिस अधिकाऱ्याची बदली करण्याचे कसबही बांदलांनी दाखवले. पण, मर्जीतील अधिकारी पुन्हा आणून पवारांनी धोबीपछाड देत बांदलांना चांगलेच घायाळ केले आहे. आजवरच्या राजकीय कारकिर्दीत सर्वच पक्षातील नेत्यांना शिक्रापुरी झटका दाखविणाऱ्या बांदलांची अवस्था सध्या `ना घर का ना घाट का` अशी झाली आहे.

लॅंड माफिया, एमआयडीसीतील गुंडगिरी अशा सुरवातीच्या तक्रारी त्यांच्याविरोधात होत्या. प्रत्यक्षात गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण एक-दोनही नव्हते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांच्यावर जमिनीसंदर्भात गुन्हे दाखल झाले. नंतर शिवाजीनगर भोसले बॅंकेत अपहाराशी त्यांचा संबंध जोडला जाऊ लागला. पुण्यातील नामांकित सराफाला ब्लॅकमेलिंग केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला.  

शिक्रापूरचे सरपंच म्हणून राजकारणाचा श्रीगणेशा करणारे मंगलदास बांदल यांनी माजी गृहराज्यमंत्री बापूसाहेब थिटे यांच्या बोटाला धरून शिरुर तालुक्याच्या राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीला शिरुर बाजार समितीचे संचालक, त्यानंतर आपला शिक्रापूर गट सोडून पाबळ-केंदूर जिल्हा परिषद गटात अपक्ष म्हणून निवडून येत राष्ट्रवादीसोबत राहून पक्षातील नेत्यांच्या खोड्या काढण्यास बांदलांनी सुरुवात केली. पुढील काळात शिक्रापूर ग्रामपंचायतीत आपला प्रभाव गट निर्माण करून तालुक्याच्या राजकारणाक आपली दाखल घ्यायला त्यांनी भाग पाडले. कोणत्याही निवडणुकीत पैशांचा सढळ हाताने वापर आणि त्याचे उघड समर्थन हे बांदलांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य राहिले आहे.

हेही वाचा : आमचा राग अजितदादांवर नव्हे, शिवसेनेवर : चंद्रकांत पाटील 
 
पाचर्णेंसह स्वतः पडले अन्‌ पवारांना आमदार केले

माजी खासदार बापूसाहेब थिटे यांच्या शिष्टाईने भाजपचे आमदार बाबूराव पाचर्णे यांना राष्ट्रवादीत पाठवून स्वत: बांदलांनी मात्र भाजपची उमेदवारी मिळविली. त्यांच्या प्रचारासाठी भाजप नेत्या (स्व.) सुषमा स्वराज यांनी शिरुरमध्ये जाहीर सभा घेतली होती. या निवडणुकीत बांदल हे स्वत:सह अपक्ष लढलेले पाचर्णे यांना घेऊन पराभूत झाले आणि २००९ मध्ये घोडगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार यांना विधानसभेत जाण्याची संधी मिळवून दिली. कारण, पाचर्णे आणि बांदल यांच्यातील मतविभागणीचा थेट फायदा पवारांना झाला आणि ते आमदार झाले. 

अजितदादांनी राखले चार हात अंतर

आगामी काळात त्यांनी राष्ट्रवादीत पुन्हा प्रवेश केला. या प्रवेशासाठी दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांचा असलेला आशीर्वाद आणि बांदलांना मिळालेले कृपाकवच हे जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय होता. राष्ट्रवादीत आल्यानंतर त्यांनी शिरुर बाजार समिती, घोडगंगा सहकारी साखर कारखाना, पुणे जिल्हा दूध संघ अशा सगळ्याच निवडणुकांत पक्षाच्या म्हणजे अशोक पवारांच्या विरोधात भूमिका घेतली. त्यामुळे पक्षश्रेष्ठींना करावी लागलेली करसत पुन्हा जिल्हा अजून विसरलेला नाही. पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी २०१७ मध्ये बांदलांनी खुद्द अजितदादांना शिक्रापुरी हिसका दाखवला. तेव्हापासूनच अजितदादाही बांदलांपासून चार हात लांबत राहत असल्याची चर्चा आहे. 

आढळराव-वळसे पाटलांना घेतले शिंगावर

जिल्ह्यातील एकेएक पद मिळाल्यानंतर बांदलांनी थेट लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला. त्यातून त्यांनी दोन लोकसभा निवडणुकीत सॉफ्टकॉर्नर राखून असलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनाच त्यांनी धक्के द्यायला सुरुवात केली. ऐकरी उल्लेख करत बांदलांनी आढळराव पाटील यांच्यावर जहरी टिका केली, त्यातून त्यांच्यामध्ये वितुष्ट आले. एकीकडे विरोधकांना अंगाव घेत असताना राष्ट्रवादीतील नेत्यांच्या विरोधातही टोकाची भूमिका घ्यायला सुरुवात केली. विधानसभेच्या २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत आंबेगाव-शिरुरमधून लढण्याची भाषा करून त्यांनी दिलीप वळसे-पाटील यांनाही दुखावून ठेवले. आमदार दिलीप मोहिते, माजी आमदार विलास लांडे आणि विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे या सर्वांना बांदलांचा अनुभव तेवढासा बरा राहिलेला नाही. त्यामुळे बांदल सध्या राजकीयदृष्ट्या कुणाचेच राहिले नाहीत.

दादागिरी, जमिनीचे व्यवहार नडले

राजकीय कुस्ती चालू असताना औद्योगिक क्षेत्रातील बांदलांची दादागिरी, दडपशाही, तसेच काही जमीन व्यवहारांबद्दल त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप त्यातून शिरूर व शिक्रापूर पोलिस ठाण्यात बांदलांवर काही गुन्हे दाखल झाले. वाढते गुन्हे पाहून बांदल कधी ना कधी तरी पोलिसांच्या कचट्यात सापडणार, असा सूर तालुक्यात होता. त्यातच मागील वर्षी पुण्यातील एका बड्या ज्वेलर्सला खंडणी मागण्याच्या प्रकरणात त्यांना अटक झाली. त्यानंतर सणसवाडी (ता.शिरूर) येथील पाणीचोरीच्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल होताच ते जिल्हा पोलिसांच्या रडारवर आले आणि त्यांचा पोलिस ठाण्यातील मुक्कामास सुरुवात झाली. 

कायदेशीर फास आवळत जाणार

पाणीचोरीनंतर त्यांच्यावर एकामागून एक गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाली. पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या बोगस कर्जप्रकरणात बांदलांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. बॅंकेकडूनही गुन्हा दाखल झाल्याने बांदलांभोवती कायदेशीर फास आवळला जाणार, हे नक्की. शिरूरच्या राजकारणात २००५ मध्ये उतरलेला पहिलवान कायद्याच्या कचाट्यात चांगलाच अडकला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com