शिवसेनेला पोखरकरांवरील अतिप्रेम नडले : सभापतिपदही गेले अन्‌ सदस्यही गमावले!

शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्यांनी दोन्ही वेळी वरिष्ठांचा तो आदेश धुडकावून लावला.
Shiv Sena was deceived by overconfidence in Khed; Sabhapti post and members also went
Shiv Sena was deceived by overconfidence in Khed; Sabhapti post and members also went

पुणे : खेड पंचायत समितीच्या अविश्वास ठराव प्रकरणात शिवसेनेने हात दाखवून अवलक्षण करून घेतले आहे. कारण, पंचायत समितीसारख्या स्थानिक राजकारणात राज्यपातळीवरील नेत्यांना आणून या प्रकरणाला महत्व देण्याऐवजी आपल्याच पक्षाच्या पंचायत समिती सदस्यांना विश्वासात घेत हा प्रश्न सोडवता आला असता. मात्र, खासदार संजय राऊतांसारख्या राष्ट्रीय प्रवक्त्यास खेडमध्ये पाठवून राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांच्याविरोधात तोफ डागूनही पक्षाचे सदस्य काही बधले नाहीत आणि शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्याविरोधातील अविश्वास ठराव पुन्हा बहुमताने मंजूर झाला. या सर्व प्रकरणात शिवसेनेचे पोखरकर यांच्यावरील अतिप्रेम नडले असून सभापतिपदही गेले आणि सदस्यही गमावले, अशी खेडमध्ये शिवसेनेची स्थिती झाली आहे. (Shiv Sena was deceived by overconfidence in Khed; Sabhapti post and members also went)

आपसांत ठरलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतही पोखरकर यांनी राजीनामा न दिल्याने शिवसेनेच्या सदस्यांनी बंडखोरी करत अविश्वास ठराव दाखल केला होता. या ठरावास सुरुवातील शिवसेनेच्या सहा, राष्ट्रवादीच्या चार आणि भाजपच्या एका सदस्याचा पाठिंबा होता. मात्र, एक बंडखोर सदस्य शिवसेनेच्या गोटात परत फिरल्याने आज झालेल्या बैठकीत हा अविश्वास दहा विरुद्ध तीन मतांनी मंजूर झाला. ठरावावरील मतदानाच्या दोन्ही वेळी शिवसेनेने व्हीप बजावला होता. मात्र, शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्यांनी दोन्ही वेळी वरिष्ठांचा तो आदेश धुडकावून लावला. अर्थात, या अविश्वास ठरावामागे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते आहेत, याची चर्चा तालुक्यात अजूनही आहे. इथपर्यंत सर्वकाही स्थानिक पातळीवर घडामोडी घडत होत्या.

अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर चिडलेल्या पोखरकरांनी आपल्याच पक्षाच्या सदस्यांवर हल्ला केला होता. त्याप्रकरणी ते अटकेत आहेत. त्याच्या दुसऱ्या दिवशी आमदार मोहिते यांनी यामागे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या आढळरावांनी मोहितेंना त्याच भाषेत उत्तर दिले होते. त्यानंतर मात्र हा वाद राज्यस्तरावर जाऊन पोचला.

खरे तर हे प्रकरण स्थानिक असून स्थानिक नेतेमंडळी ते पाहून घेतील, असे सांगून शिवसेनेने याकडे डोळेझाक करायला हवी होती. कारण, अविश्वास ठरावच शिवसेनेच्या सदस्यांनी आणला होता. भलेही त्यांना मोहिते यांची फूस असेल. त्याचवेळी शिवसेनेने ठरल्याप्रमाणे पोखरकर यांचा राजीनामा घेत सदस्यांची समजूत घालायला हवी होती. मात्र, आपलेच सदस्य सभापती पोखरकर यांच्या विरोधात गेल्याकडे दुर्लक्ष करत शिवसेनेने सभापतींवर अतिप्रेम दाखविले. तेच शिवसेनेला नडले. सभापतीपदासाठी आमच्या जीवावर उठलेल्या समर्थनार्थ पक्ष आम्हाला मतदान करण्यास सांगत असेल तर ते आम्हाला मान्य नाही. पद गेले तरी बेहत्तर पण ठरावाच्या बाजूनेच मतदान करणार, अशी भूमिका या सदस्यांनी घेतली. त्यामुळे शिवसेनेचे सभापतीपदही गेले आणि हातचे सदस्यही गेले, अशी अवस्था शिवसेनेची झाली आहे. 

शिवसेनेचे खासदार तथा राष्ट्रीय प्रवक्ते संजय राऊत यांनी राजगुरुनगरमध्ये येऊन आमदार मोहिते यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. दिलीप मोहिते यांना माज आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना वेसन घालावी; अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने बंदोबस्त करू, असा इशारा दिला होता. तसेच, मोहिते यांचे घाणरेडे राजकारण आपण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापर्यंत घेऊन जाऊ, असेही त्यांनी म्हटले होते. तसेच, आमच्या सदस्यांबाबत काय करायचे, ते आम्ही ठरवू, असेही त्यांनी त्यावेळी सांगितले होते. त्याला आमदार मोहिते यांनी उपहासात्मक उत्तर देताना राऊत हे पंतप्रधान मोदींना धमक्या देता, मला भीती वाटतेय, असे म्हटले होते. 

एकीकडे संजय राऊत यांच्यासारखे नेते राजगुरुनगरमध्ये येऊन गेले, तर पक्षीय पातळीवर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे आपल्या पक्षाच्या सदस्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न करत होते. दरम्यानच्या काळात हे अविश्वासाचे राजकारण कोर्टात गेले. कोर्टाने त्यावर निकाल देताना पुन्हा मतदान घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज मतदान घेण्यात आले. तत्पूर्वी शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान करण्याचा आदेश असल्याचे सांगत व्हीप काढला होता. मात्र, तोही शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्यांनी धुडाकवून लावत विरोधात मतदान केले.

शिवसेना काय करणार?

मुख्यमंत्र्यांचा आदेश धुडकावून लावल्यामुळे शिवसेना आता या सहा सदस्यांचे पद रद्द करण्यासाठी वेगवान हालचाली करेल. शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी ९ जून रोजीच पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल सहा सदस्यांना अपात्र ठरविण्यासाठी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दाखल केला आहे. तो सत्तेच्या जोरावर शिवसेना मंजूरही करून घेईल. मात्र, खेड पंचायत समितीची निवडणूक लवकरच जाही होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तसा फरक या सदस्यांना पडणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com