Sanjay Raut answers Chandrakant Patil's allegations
Sanjay Raut answers Chandrakant Patil's allegations

आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही, तर समोरून थेट कोथळाच काढतो

शब्द आम्ही फिरवला नाही, तर तो तुम्ही फिरवलात.

पुणे : आम्ही समोरून थेट कोथळाच काढतो. पाठीत खंजीर खुपसत नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची अवलाद आहोत, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्या आरोपाला उत्तर दिले. तसेच, शब्द आम्ही फिरवला नाही, तर तो तुम्ही फिरवलात, असाही टोला त्यांनी चंद्रकांतदादांना लगावला. (Sanjay Raut answers Chandrakant Patil's allegations)

जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे आज (ता. ४ सप्टेंबर) शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात संजय राऊत यांन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आरोपांना उत्तर दिले.

राज्यात 55 आमदारवाल्यांचा मुख्यमंत्री, 54 आमदार असणाऱ्यांचा उपमुख्यमंत्री, तर 44 आमदारवाल्यांचा महसूल मंत्री झाला आहे. हे 105 च्या नादात हात चोळत बसले. परंतु येतील येतील म्हणता म्हणता कुठे गेले, हे कळलेच नाही, यालाच म्हणतात ‘फटे लेकिन हटे नही’ अशा शब्दांत खासदार राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला टोला लगावला.

राऊत म्हणाले की, राज्यात तीन पक्षाचं सरकार असलं तरी ज्यांचा मुख्यमंत्री असतो, त्याचं सरकार असतं. हे ठाकरे सरकार असून आमचं सरकार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार आपलेच असून शरद पवार यांनी देशाचे नेतृत्व करावं. पण, या सर्वांच्या वर शिवसेना आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालू असुन भविष्यात त्यांच्यात देशाचे नेतृत्व करण्याची कार्यक्षमता आहे. 

जुन्नरच्या शिवसैनिकांचे महाराष्ट्रात वेगळे मार्केट आहे, ते कमी होत नसून राज्यात ५५ ठिकाणी भगवा फडकला आहे. जुन्नरमध्येही भगवा फडकायला हवा होता, तो फडकला नसल्याची खंत आहे. तसेच, शिवसेना हे एक मंदिर आहे. डोक्यात राग घालून जायचे आणि परत यायचे, असे करू नका. आपले एकच कुटुंब आहे. जो शिवसेनेतून गेला, तो दुसऱ्या घरात सुखी होत नसतो. जे बोचके बाहेर गेले, ते परत आले तरी त्यांना परत घ्यायचे नाही, अशी टीका त्यांनी नाव न घेता आशा बुचके यांच्यावर केली. 

माजी आमदार रवींद्र मिर्लेकर म्हणाले की भविष्यात जुन्नरचा आमदार हा शिवसेनेचाच असेल. त्यासाठी शिवसैनिकांनी आतापासूनच कामाला लागावे. शिवसेनेने अनेकांना मोठे केले आहे. मात्र, त्यांना त्याची जाणीव नाही. 

माजी खासदार आढळराव पाटील म्हणाले की, राज्यात जरी महाआघाडी असली तरी येणाऱ्या सर्व निवडणुका शिवसेना पक्ष स्वबळावर लढणार आहे. त्यामुळे सर्वांनी तयारी लागावे.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com