आमदार महेश लांडगेंना महिन्यात दुसरा धक्का; भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश - BJP workers from MLA Mahesh Landages constituency joined Shiv Sena | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

आमदार महेश लांडगेंना महिन्यात दुसरा धक्का; भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 13 जून 2021

आठ महिन्यांवर आलेल्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून झालेले हे दुसरे आऊटगोईंग आहे.

पिंपरी : गत महापालिका निवडणुकीत भाजपमध्ये (BJP) गेलेले पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचे (NCP) अनेक नगरसेवक स्वगृही परतण्याच्या मार्गावर आहेत. त्यातही शहरातील भोसरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघातील हे नगरसेवक या वर्षाअखेर घऱवापसी करण्याचे संकेत मिळत आहेत. पण, त्याअगोदरच शिवसेनेने गतवेळी भाजपमध्ये गेलेले आपले काही पदाधिकारी, कार्यकर्ते यांना परत आणून राष्ट्रवादीवर आघाडी घेतली आहे. शहराचे कारभारी व भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या भोसरी मतदारसंघातील हे कार्यकर्ते असल्याने या पक्षांतराची चर्चा आहे. (BJP workers from MLA Mahesh Landage constituency joined Shiv Sena)

आठ महिन्यांवर आलेल्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून झालेले हे दुसरे आऊटगोईंग आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गेल्यावर्षी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या कट्टर समर्थक असलेल्या भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा ओबीसी महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा सारिका पवार यांनीही लगेच राजीनामा दिला होता. त्यांनी गेल्या महिन्यात १९ तारखेला मुंबईत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्या आमदार लांडगेच्याच मतदारसंघातील आहेत. तर, शनिवारी (ता.१२) शिवसेनेत प्रवेश केलेले कार्यकर्ते हे सुद्धा त्यांच्यात मतदारसंघातील आहेत.

हेही वाचा : शेतकरी संतापले; अधिकाऱ्यांना बैठकीतच दिली जीवे मारण्याची धमकी

फेब्रुवारी 2022 मध्ये होणा-या पिंपरी महापालिकाच्या निवडणुकीपुर्वी मोठ्या प्रमाणात शिवसेनेत प्रवेश होतील. त्याची ही नांदी आहे. यामुळे भोसरी विधानसभेत शिवसेनेला गतवैभव प्राप्त होईल असे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या प्रवेशाच्या वेळी केले. त्यांच्या लांडेवाडी (ता.आंबेगाव,जि.पुणे) येथील निवासस्थानी ही घरवापसी झाली. शिवसेनेचे पिंपरी चिंचवड शहरप्रमुख अॅड.सचिन भोसले, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट यावेळी उपस्थित होते. 

शिवसेनेत विभागप्रमुख राहिलेले शैलेश उर्फ तुकाराम मोरे यांच्यासह सुनिल वाटे, श्रीकांत करोली, बाबासाहेब काळोखे, संदिप चव्हाण, बटू पाटील, किशोर शिनगारे, अशोक चव्हाण, भारत नरवडे, संजय पाटील आदींचा त्यात समावेश आहे. त्यांनी गत पालिका निवडणुकीच्या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र,तेथील नाराजीतून त्यांनी पुन्हा काल शिवबंधन हाती बांधले. 

पिंपरी चिंचवड शहरातील भाजपच्या आणि महापालिकेतील त्यांच्या पदाधिका-यांच्या कारभाराला जनता कंटाळून त्यांचे पदाधिकारी शिवसेनेत येत असल्याचा दावा अॅड. भोसले यांनी यावेळी केला. आमदार लांडगे यांच्या विश्वासू कार्यकर्त्यांचा हा शिवसेना प्रवेश म्हणजे आगामी काळात शहरातील अनेक कार्यकर्ते, आजी, माजी नगरसेवकांचे प्रवेश होणार असल्याची चाहुल आहे, असे ते म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख