शेतकरी संतापले; अधिकाऱ्यांना बैठकीतच दिली जीवे मारण्याची धमकी - Farmers threatened to kill the officers during the meeting | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

शेतकरी संतापले; अधिकाऱ्यांना बैठकीतच दिली जीवे मारण्याची धमकी

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 13 जून 2021

रिंगरोडसाठी भुसंपादन करण्यास शेतकर्‍यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

उरुळी कांचन (जि. पुणे) : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) रिंगरोडच्या कामाची माहिती देण्यासाठी अधिकाऱ्यांकडून बैठक घेण्यात आली. पण रिंगरोडसाठी (RingRoad) भुसंपादनाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांनाच जीवे मारण्याची धमकीवजा इशारा दिल्याचा प्रकार समोर आला आहे. (Farmers threatened to kill the officers during the meeting)

रिंगरोडसाठी भुसंपादन करण्यास शिंदवने, कोरेगाव मूळसह पुर्व हवेलीमधील सर्वच भागातील शेतकर्‍यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. पुर्व हवेलीतील शेतकरी संतापले असून त्याचे पडसाद रविवारी झालेल्या बैठकीत उमटले. रिंगरोडची माहिती देण्यासाठी प्रकल्पबाधित शेतकर्‍यांच्या बैठका शिंदवणे व कोरोगाव मुळ येथे झाल्या. उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, एमएसआरडीसीचे अभियंता संदीप पाटील, हवेलीच्या तहसिलदार तृप्ती कोलते, अप्पर तहसिलदार विजयकुमार चोबे आदी यावेळी उपस्थित होते. 

हेही वाचा : इंधन दरवाढीवर पेट्रोलियम मंत्री म्हणतात...आम्ही पैशांची बचत करतोय!

कोरेगाव मुळ येथील एका शेतकऱ्याने रिंगरोडसाठी भुसंपादन करताना शासनाने अंधारात ठेवल्याचा आरोप केला. रिंगरोडला विरोध दर्शवत शेतकऱ्यांचा विरोध डावलून जमिनी जबरदस्तीने ताब्यात घेतल्यास अधिकाऱ्यांना खून करण्याची जाहीर धमकी या शेतकऱ्याने दिली. यावेळी या शेतकऱ्याने बैठकीला उपस्थित एका अधिकाऱ्याचे नावही घेतले.

बैठकीमध्ये बोलताना शिंदवणे गावचे माजी सरपंच अण्णासाहेब महाडीक म्हणाले, आधीपासूनच पी.एम.आर.डी.ए व सार्वजनिक बांधकाम विभागाचा एक असे दोन रिंगरोड प्रस्तावित आहेत. तिसर्‍या रिंगरोडची आवश्यकता नाही. प्रस्तावित रिंगरोडमुळे पुर्व भागातील हजारो एकर बागायत क्षेत्र जाणार असुन अनेक शेतकरी भुमिहीन होतील. पूर्व हवेलीतून सुमारे १०३ किलोमीटर लांबीचा रिंगरोड ८२५ हेक्टर जागेमधून जाणार आहे. त्यामुळे या रिंगरोडचा फेरविचार करावा. 

कोरेगाव मुळ, शिंदवने, सोरतापवाडीसह पुर्व हवेलीमधील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी कालवा, महामार्ग, रिंगरोड यासाठी याआधीही संपादित केलेल्या आहेत. वारंवार जमिनीचे संपादन झाल्याने, पुर्व हवेलीमधील शेतकरी अल्पभुधारक झाले आहेत. आमच्या जमिनी शासनाने वारवांर घेतल्या तर आम्हाला हिमालयात जाण्याशिवाय मार्ग उरणार नाही, अशी संतप्त भावना कोरेगाव मुळ येथील शेतकऱ्यांच्या वतीने बोलतांना अशोक इनामदार यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांना मिळेल पाचपट मोबदला

सचिन बारवकर यांनी जमिनीचा पाचपट मोबदला देणार असल्याची माहिती यावेळी दिली. ते म्हणाले, भुसंपादन करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेतले जाईल. भुसंपादनाला विरोध न करणाऱ्या शेतकर्‍यांना रेडीरेकरनच्या पाचपट मोबदला देण्यात येईल. सहमती न देणाऱ्या शेतकऱ्यांना चारपट मोबदला मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी सहकार्य करावं, असं आवाहन बारवकर यांनी केलं.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख