वीज कनेक्‍शन तोडणीवर राज्यमंत्री दत्तात्रेय भरणेंचे मौन का?  - Why is Minister of State Dattatreya Bharane silent on power conection cuting? | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

वीज कनेक्‍शन तोडणीवर राज्यमंत्री दत्तात्रेय भरणेंचे मौन का? 

डॉ. संदेश शहा 
शुक्रवार, 26 मार्च 2021

महाविकास आघाडी सरकारला शेतकऱ्यांशी काहीही देणेघेणे नसून हे फसवे सरकार आहे. 

इंदापूर (जि. पुणे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शेतकऱ्यांची वीज तोडणार नसल्याचे अधिवेशनात सांगतात, तर अधिवेशन संपताच राज्याचे वीजमंत्री डॉ. नितीन राऊत वीजजोड तोडण्यास सांगतात. इंदापूरचे लोकप्रतिनिधी तथा राज्याचे सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे मात्र या प्रश्नावर सूचक मौन बाळगतात. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला शेतकऱ्यांशी काहीही देणेघेणे नसून हे फसवे सरकार असल्याचे सिद्ध होते, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली. 

इंदापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेते माजी मंत्री पाटील बोलत होते.

ते म्हणाले की, वीज कनेक्‍शन तोडणी मोहिमेमुळे पाणी असूनही केवळ वीज नसल्याने पिके जळून चालली आहेत. काही गावांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारची भूमिका असावयास हवी. मात्र, महाविकास आघाडी सरकार अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची वीज खंडित करीत आहे. सरकारमधील विविध पक्षांनी संपूर्ण कर्जमाफी व मोफत विजेचे आश्वासन दिले होते. परंतु या शब्दाला जागणे तर दूरच उलट वीज रोहित्रे बंद करून शेती पंपांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. 

हेही वाचा  :  महाआघाडीला फुटीचे ग्रहण; शिवसेनेच्या शैला गोडसेंनी भरला पंढरपुरातून अर्ज 

कोरोना, अतिवृष्टी यामुळे शेती नुकसानीत जाऊन शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला आहे. तरी देखील अनेक शेतकऱ्यांनी वीज बिलाची रक्कम भरलेली आहे, त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने तत्काळ शेतीचा वीजपुरवठा पूर्ववत करणे गरजेचे आहे, असेही हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले. 

सध्या उन्हाळा वाढत चालला असून वीज कनेक्‍शन तोडणी मोहिमेमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. गावोगावच्या नळ पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा महावितरणने वीजबिल न भरल्याने खंडित करू नये, असे सूतोवाच पाटील यांनी केले आहे. या प्रश्नावर आंदोलन करूनही महाविकास आघाडीचे सरकार दखल घेत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिला आहे. 

महावितरणने शेती पंपाचा वीजपुरवठा खंडित करून शेतकऱ्यांकडून सक्तीने वीज बिलांची वसुली सुरू केली आहे. त्यांचा तसेच त्यास पाठिंबा देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा मी जाहीर निषेध करत असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख