मंत्रिपद नाकारल्याने नाराज असलेल्या सावंतांनी अखेर शिवसेना नेतृत्वाशी जुळवून घेतले - upset Tanaji Sawant finally reconciled with the Shiv Sena leadership | Politics Marathi News - Sarkarnama

मंत्रिपद नाकारल्याने नाराज असलेल्या सावंतांनी अखेर शिवसेना नेतृत्वाशी जुळवून घेतले

प्रशांत काळे
शुक्रवार, 7 मे 2021

त्यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री ठाकरे यांच्यापुढे आदळाआपट केली होती.

बार्शी (जि. सोलापूर)  : राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने गेली एक ते दीड वर्षापासून शिवसेना नेतृत्वावर नाराज असलेल्या आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी अखेर पक्षाशी जुळवून घेतले आहे. पक्षाचे पहिल्या फळीतील नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), मुख्यमंत्र्यांचे विश्वासू आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांना बार्शीत उभारलेल्या कोविड सेंटरच्या उद्‌घाटनासाठी आमंत्रण देत सावंत यांनी दोन पावले मागे जात पक्षनेतृत्वाशी सलोख्याचे संबंध राहतील, याची काळजी घेतली आहे. (upset Tanaji Sawant finally reconciled with the Shiv Sena leadership)

बार्शी येथील लातूर-बार्शी बाह्यवळण रस्त्यावरील भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयात आमदार तानाजी सावंत यांच्या वतीने एक हजार बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. त्याचे उदघाटन शुक्रवारी (ता. ७ मे) नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांच्या हस्ते झाले. 

या प्रसंगी आमदार तानाजी सावंत, आमदार राजेंद्र राऊत, प्रा. शिवाजी सावंत, माजी मंत्री दिलीप सोपल, राजेंद्र मिरगणे, भाऊसाहेब आंधळकर, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, नागेश अक्कलकोटे आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा : कोरोनाच्या संकटात तुमचा पालकमंत्री अहोरात्र झटतोय 

राज्यात दीड वर्षापूर्वी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले. तीन पक्षांची आघाडी असल्याने अनेक इच्छुकांना मंत्रिपदापासून दूर राहावे लागले. त्यामुळे तीनही पक्षातील अनेकांना आपल्या इच्छेला मुरड घालावी लागली. पण, काहींनी आपल्या पक्षश्रेष्ठींपुढे उघड उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यात शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचा समावेश होता. 

अगोदरच्या फडणवीस सरकारमध्ये जलसंधारण मंत्री असलेल्या सावंत यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी अपेक्षा होती. पण, मंत्रीपदाची संधी न मिळाल्याने त्यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री ठाकरे यांच्यापुढे आदळाआपट केली होती. तसेच त्यांनी पक्षप्रमुखांपुढे निर्वाणीची भाषा बोलली होती. त्यामुळे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही त्यांच्यावर नाराज होते. हा सिलसिला गेली वर्षभर सुरू होता. 

आमदार सावंत हे उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम-परांडा या मतदारसंघातन निवडून आलेले असले तरी ते मूळचे सोलापूर जिल्ह्यातील माढ्याचे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र, गेली वर्षभरात त्यांनी जिल्ह्यात पक्षाची एकही बैठक घेतली नव्हती. तसेच, पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमाला हजेरी लावलेली नव्हती. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेवर पक्षश्रेष्ठीही नाराज होते.

कोविडची सोलापूर जिल्ह्यातील परिस्थिती पाहता तातडीने आरोग्य सुविधा उभारणे गरजेचे आहे. ती गरज ओळखून आमदार सावंत यांनी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या बार्शीत कोविड सेंटर उभारले आहे. त्याच्या उदघाटनासाठी एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांना आमंत्रित करत सावंत यांनी शिवसेनेशी पुन्हा जुळवून घेतल्याचे संकेत मिळत आहेत. तसेच पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही एकनाथ शिंदे यांच्या जोडीला आपल्या खास मर्जीतील नार्वेकर यांना या कार्यक्रमाला पाठवून सावंत हेही पक्षापासून फार दूर जाणार नाहीत, याची काळजी घेतल्याचे दिसून येत आहे.

 उस्मानाबादच्या खासदारांवर नाराजी कायम

मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या तानाजी सावंत यांचे उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी तेवढे सख्य राहिलेले नाही. कारण, उस्मानाबाद जिल्ह्याच्या आमसभेत त्यांचे खासदार निंबाळकर यांच्याशी खटके उडाले होते. शिवाय, पालकमंत्री गडाख यांनाही सावंत यांनी धारेवर धरले होते. आपल्याच पक्षाला अडचणीत आणण्याचे काम त्या बैठकीत सावंत यांनी केले होते. कोविड सेंटर उद्‌घाटन कार्यक्रमाच्या जाहिरातीमधून बार्शीचे खासदार असूनही निंबाळकर यांना वगळण्यात आले होते. त्यामुळे सावंतांची खासदार निंबाळकर यांच्यावरील नाराजी कायम असल्याचे दिसून येते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख