कोरोनाच्या संकटात तुमचा पालकमंत्री अहोरात्र झटतोय - Your guardian minister is working day and night in the crisis of Corona : Dattatreya bharane | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनाच्या संकटात तुमचा पालकमंत्री अहोरात्र झटतोय

प्रमोद बोडके
शुक्रवार, 7 मे 2021

त्याने काहीच फरक पडत नाही.

सोलापूर : मी सोलापुरात (Solapur) तीन दिवस राहिलो काय? आणि एक दिवस येऊन गेलो काय? त्याने काहीच फरक पडत नाही.  सोलापुरात महापौर, आमदार, खासदार व नगरसेवक आहेत. त्यांच्या माध्यमातून कोरोना (Corona) महामारीतील प्रश्न सोडविता येतात. सोलापूर शहर व जिल्ह्यावर आलेले कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी तुमचा पालकमंत्री अहोरात्र झटत आहे, अशा शब्दांत सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे ( Dattatreya bharane) यांनी आज (ता. ७ मे) त्यांच्यावर होत असलेल्या टीकेला उत्तर दिले. (Your guardian minister is working day and night in the crisis of Corona : Dattatreya bharane)  

सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असलेल्या उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री भरणे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्यानंतर सात रस्ता येथील नियोजन भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्यासह जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

हेही वाचा : सतेज पाटील, मुश्रीफांच्या पराभवासाठी अनेकांनी देव पाण्यात घातले होते 

पालकमंत्री भरणे म्हणाले, सोलापूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड वेळेवर मिळावेत यासाठी मी सोलापूर, पुणे व मुंबईतील अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात आहे. मोबाईल, दूरध्वनी व्हिसीच्या माध्यमातून कोरोनाच्या लढाईत आवश्यक असलेली मदत करण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांत जाऊन त्या त्या तालुक्यांतील कोरोनाची स्थिती, उपाय योजना व येणाऱ्या अडचणींचा आढावा घेत आहे. कोरोनाच्या लढाईत आपण तालुका पातळीवर जाऊन काम करत आहोत, असाही दावा भरणे यांनी या वेळी केला. 

कोरोना महामारीत काही खासगी रुग्णालये रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिले आकारत असल्याच्या तक्रारी भरणे यांच्यापर्यंत आल्या आहेत. त्याबाबत पालकमंत्री म्हणाले, बिले तपासण्यासाठी यापूर्वी नियुक्त केलेल्या ऑडिटर समितीच्या माध्यमातून बिलांची तपासणी केली जाईल. ज्या रुग्णालयांनी जास्त बिलं घेतली आहेत, त्यांच्याकडून वाढीव बिलाची रक्कम रुग्णांना परत दिली जाईल. दोषींवर कारवाई करण्याचे अधिकार हे जिल्हा प्रशासनाला आहेत. कोरोना महामारीत नागरिकांची लूट करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

 
रमजान खरेदीसाठी 11 व 12 मे रोजी शिथिलता

सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी 8 ते 15 मे या कालावधीत कडक लॉकडाउनचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान 14 किंवा 15 मे रोजी रमजान ईद होण्याची शक्यता आहे. ईदच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी शिथिलता द्यावी, अशी मागणी सोलापुरातील मुस्लिम समाज बांधवांनी केली आहे. या मागणीची दखल पालकमंत्री भरणे यांनी घेतली असून 11 व 12 मे रोजी खरेदीसाठी लॉकडाउनमधून शिथिलता देण्याबाबत निर्णय घेण्याची सूचना पालकमंत्री भरणे यांनी जिल्हा प्रशासनाला केली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख