पंढरपूरच्या निकालामुळे अक्कलकोट पोटनिवडणुकीच्या आठवणी ताज्या   - The Pandharpur result recalls memories of the Akkalkot by-election | Politics Marathi News - Sarkarnama

पंढरपूरच्या निकालामुळे अक्कलकोट पोटनिवडणुकीच्या आठवणी ताज्या  

अभय दिवाणजी
बुधवार, 5 मे 2021

यांसारख्या काही घटनांमध्ये साम्य आहे.

सोलापूर  ः पंढरपूर (Pandharpur) पोटनिवडणुकीच्या निकालामुळे 1998 मध्ये झालेल्या अक्कलकोटच्या (Akkalkot) पोटनिवडणुकीच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या. त्याचे कारणही तसेच आहे. तेव्हाच्या सत्तारुढ सरकारमधील घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा विरोधी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवाराने पराभव केला होता. तेव्हाही भाजप- शिवसेना युतीच्या उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील डझनभर मंत्र्यांनी अक्कलकोट मतदासंघात हजेरी लावली होती. यांसारख्या काही घटनांमध्ये साम्य असल्याने अक्कलकोटच्या त्या निवडणुकीची आठवण पुन्हा ताजी झाली आहे. (The Pandharpur result recalls memories of the Akkalkot by-election)

विधानसभेच्या 1995 च्या निवडणुकीत अक्कलकोट मतदारसंघात (कै.) म. शफी टिनवाला (कॉंग्रेस), चंद्रकांत इंगळे (बहुजन समाज पार्टी), सिद्रामप्पा पाटील (अपक्ष) व (कै.) बाबासाहेब तानवडे (भारतीय जनता पक्ष) अशी चौरंगी लढत झाली होती. अत्यंत चुरशीच्या या लढतीत (कै.) तानवडे यांनी विजयश्री खेचून आणली होती. भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून अक्कलकोटची तेव्हापासूनची ओळख आहे.

सोलापूरहून पुण्याकडे निघालेल्या तानवडे यांचा 1998 मध्ये अपघाती मृत्यू झाला. अक्कलकोट मतदारसंघात प्रचंड हळहळ व्यक्त झाली. जनभावना तीव्र होत्या. (कै.) बाबासाहेब म्हणजे तालुक्‍यातील कार्यकर्त्यांचे श्रद्धास्थानच. त्यांची छायाचित्रे आजही अनेकांनी आपल्या घरात, कार्यालयांत, दुकानांत लावलेली आहेत. अशा बाबासाहेबांच्या अचानक जाण्याने तालुक्‍याची मोठी हानी झाली. कारण भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे युती सरकार त्यावेळी सत्तेवर होते.

हेही वाचा : खासदार मंडलिकांच्या बहिणीचा अन्‌ मुलाचा पराभव ठरवून घडवल्याची चर्चा

तानवडे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक लागली. पक्षातून अन्‌ सर्वच पातळीवरून (कै.) बाबासाहेबांची पत्नी महानंदा की मुलगा प्रसन्न अशी द्विधा मनस्थिती होती. त्यातच (कै.) बाबासाहेबांचे भाऊ दत्तात्रेय तानवडे यांचे नावही चर्चेत होते. त्यांचाही जनसंपर्क दांडगा होता. कार्यकर्त्याला हाताळण्याची वेगळी हातोटी होती. शेवटी पक्षाने सहानुभूती मिळवण्यासाठी महानंदा तानवडे यांना उमेदवारी दिली. पंचायत समितीचे तत्कालिन सभापती सिद्धाराम म्हेत्रे यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळाली. पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत जयश्री भारत भालके यांना उमेदवारी देऊन सहानुभूती मिळवण्याची योजना होती. परंतु, नंतर भगिरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली. आता जयश्रीताईंना उमेदवारी दिली असती तर..? अशा चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.

पंढरपूरच्या पोटनिवडणुकीप्रमाणेच अक्कलकोटच्या पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजप युतीच्या डझनभर मंत्र्यांनी प्रचारसभा, गावोगाव भेटीगाठी, संपर्क सारे-काही केले होते. तत्कालिन उपमुख्यमंत्री (कै.) गोपीनाथ मुंडे यांचे (कै.) तानवडे यांच्यावर विशेष प्रेम होते. त्यांनी तर अक्कलकोटला ठाण मांडून महानंदाताईंना विजयी करण्याचा चंगच बांधला होता. परंतु म्हेत्रे यांनी दोन हजार 828 मतांनी विजय मिळवला. त्यावेळी एकत्र कॉंग्रेसमध्ये असलेले शरद पवार यांचा म्हेत्रे यांच्या पाठीवर ‘हात' होता. पंढरपुरातही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भालके यांच्यासाठी चंग बांधला होता
 
विद्यमान आमदाराच्या निधनानंतर आजपर्यंत झालेल्या निवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेवर संबंधितांची पत्नीच निवडून येत होती, असा इतिहास (अपवाद असू शकेल) होता. परंतु अक्कलकोटमध्ये मात्र चित्र वेगळे दिसले. आज पंढरपुरातही तीच स्थिती आहे. भारत भालके यांच्या निधनानंतरच्या पोटनिवडणुकीत सहानुभूतीचा लाभ मिळालेला नाही. या निमित्ताने अक्कलकोटच्या पोटनिवडणुकीवेळच्या आठवणी मात्र ताज्या झाल्या आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख