खासदार मंडलिकांच्या बहिणीचा अन्‌ मुलाचा पराभव ठरवून घडवल्याची चर्चा

आगामी काळात मंडलिक गट कोणती भूमिका घेणार, याकडे कोल्हापूरकरांचे लक्ष लागले आहे.
Defeat of Sushmita Patil and Virendra Mandlik in Gokul election
Defeat of Sushmita Patil and Virendra Mandlik in Gokul election

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर (गोकुळ) गेली ३० वर्षांपासून असलेली महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) यांची सत्ता पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी उलथवून टाकली. ‘गोकुळ’च्या २१ जागांपैकी १७ जागा जिंकत दणदणीत विजय मिळविला. पण, या दमदार विजयाला खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांच्या कुटुंबातील आत्या आणि भाच्याच्या पराभवाचे गालबोट लागले आहे. खासदार मंडलिक यांचे सुपुत्र वीरेंद्र मंडलिक यांना तर विरोधी पॅनेलमधीलच काहींनी ठरवून पाडल्याची चर्चा कोल्हापूर जिल्ह्यात रंगली होती. (Defeat of Sushmita Patil and Virendra Mandlik in Gokul election)

गोकुळ दूध संघावर असलेले महाडिकांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयापासून जनतेच्या दरबारापर्यंत लढाई लढले आणि जिंकलेही. या विजयाच्या माध्यमातून सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील राजकारणावर आपली पकड आणखी घट्ट केली आहे. तत्पूर्वी २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या सतेज पाटील यांनी पुढची राजकीय दिशा ओळखून संजय मंडलिक यांच्याशी जुळवून घेतले. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीशी आघाडी असताना त्यांनी मंडलिक यांचे काम करत पुढील राजकीय मार्ग मोकळा केला. मंडलिक यांना लोकसभा निवडणुकीत केलेल्या मदतीचा फायदा त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाटील यांना झाला. लोकसभेला धनंजय महाडिक यांचा, तर विधानसभेला अमल महाडिक यांना पराभूत केले. त्यानंतर संपूर्ण लक्ष गोकुळच्या निवडणुकीवर केंद्रीत केले. त्यासाठीची तयारी त्यांनी पूर्वीपासूनची केली होती.

महाडिकांचे गोकुळवरील वर्चस्व मोडीत काढण्यासाठी त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना आपले करण्याचा प्रयत्न केला. सत्तारुढ गटातील काहींना आपल्या गोटात ओढले. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांना सोबत घेतले. त्यातून त्यांनी आमदार राजेश पाटील यांच्या पत्नी आणि खासदार संजय मंडलिक यांच्या भगिनी सुश्मिता पाटील आणि खासदारांचे चिरंजीव वीरेंद्र मंडलिक यांना आपल्या पॅनेलमधून तिकिट दिले. मात्र, अटीतटीच्या लढतीत या दोघांचीही पराभव झाल्याने जिल्ह्यातील मंडलिक गटाला तो धक्का समजला जात आहे. राज्यात जितकी चर्चा ‘गोकुळ’मधील सत्तांतराची सुरू आहेत, तेवढीच चर्चा कोल्हापूर जिल्ह्यात आत्या आणि भाच्याच्या पराभवाची होत आहे.

महिला गटात सर्वाधिक चुरशीची लढत ही राजेश पाटील यांच्या पत्नी सुश्मिता पाटील आणि महादेवराव महाडिक यांच्या सूनबाई शौमिका महाडिक यांच्यातच झाली. सुरुवातीच्या सहा फेऱ्यांपर्यंत सुश्मिता पाटील या आघाडीवर होत्या. पण सहाव्या फेरीनंतर झालेल्या सातव्या आणि आठव्या फेरीत त्या पिछाडीवर गेल्या आणि त्या पराभूत झाल्या. त्यांचा पराभव आमदा राजेश पाटील यांच्यासाठी जेवढा धक्कादायक होता, तेवढाचा खासदार संजय मंडलिक यांच्यासाठी वेदनादायी होता.

एकीकडे महिला गटातून बहिणाचा पराभव होत असताना सर्वसाधारण गटातून लढलेला मुलगा वीरेंद्र मंडलिक यांचाही पराभव झाला. या दुहेरी पराभवाचे दुः ख काल मंडलिक यांच्या पदरी पडले. सुश्मिता पाटील यांना कोणी मते दिली, कोणी दिली नाहीत, याची चर्चा सुरू असतानाच तिकिट नाकारल्यामुळे स्वकीयांनीच घात केला की काय, अशीही चर्चा रंगली आहे. तसेच, वीरेंद्र मंडलिक यांनाही विरोधी गटातील काही लोकांनी ठरवून पाडल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी काळात मंडलिक गट कोणती भूमिका घेणार, याकडे कोल्हापूरकरांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com