महेश कोठेंचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार; पण या नेत्याच्या ग्रीन सिग्नलनंतरच - Mahesh Kothe will get entry  in NCP only after the permission of Chief Minister Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

महेश कोठेंचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार; पण या नेत्याच्या ग्रीन सिग्नलनंतरच

तात्या लांडगे
गुरुवार, 10 जून 2021

शरद पवार यांनी महेश कोठे यांना विचारले.

सोलापूर : शिवसेनेतील गटतट आणि कुरघोडीच्या राजकारणाला वैतागून माजी महापौर तथा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख महेश कोठे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची वाट धरली. पण त्यांचा अजूनही राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश झालेला नाही. मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीला कोठे उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतरच महेश कोठे यांनाचा राष्ट्रवादीत प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Mahesh Kothe will get entry  in NCP only after the permission of Chief Minister Uddhav Thackeray)
 
महेश कोठे हे काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी आपल्या समर्थकांसह मुंबईत गेले हेाते. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर कोठे यांचा राष्ट्रवादी प्रवेश लांबला आहे. मात्र, त्या दिवशी त्यांच्या काही समर्थकांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला होता.

हेही वाचा : राष्ट्रवादीच्या पराभवाची जखम वर्धापनदिनी पंढरपूर-मंगळवेढ्यात अधिकच दुखली!

मागील काही महिन्यांपासून महेश कोठे हे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांना आवर्जुन हजेरी लावत आहेत. दरम्यान, मुंबईतील बैठकीलाही तेही हजर होते. त्यावेळी तुम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष व्हायला इच्छूक असल्याचे समजल्याचे शरद पवार यांनी महेश कोठे यांना विचारले. परंतु, मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून कोठे यांचा पक्षप्रवेश थांबला आहे. 

कोठे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेल्यानंतर शहरातील शिवसेनेची ताकद कमी होऊन महापालिकेत त्यांचे अस्तित्व राहणार नाही. त्यामुळे कोठे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील पक्षप्रवेश थांबल्याची चर्चा आहे. दरम्यान, महेश कोठे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांचे समर्थक नगरसेवकदेखील पक्ष सोडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कोठे यांची राष्ट्रवादी प्रवेशाची वाट खडतर मानली जात आहे.

शरद पवारांचा पालकमंत्र्यांना सबुरीचा सल्ला

आगामी निवडणुकीसंदर्भात सोलापूर महापालिका, जिल्हा परिषद निवडणूक, जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेऊन रणनीती आखण्याच्या दृष्टीने मंगळवारी (ता. 8 जून) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबई पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी पालकमंत्र्यांबद्दल त्यांच्याकडे आलेल्या तक्रारींची शहानिशा झाली.

दरम्यान, शरद पवार यांनी पालकमंत्र्यांना फोन करून तत्काळ बोलावले. त्यावेळी मंत्रालयात असलेले पालकमंत्री दत्तात्रेय भरणे हे पवार यांच्या भेटीला निघाले. त्यांनी पालकमंत्र्यांकडून तक्रारींबद्दल विचारले आणि त्यांना सबुरीचा सल्ला दिला. तसेच, सोलापूर शहरातील पदाधिकाऱ्यांच्या पालकमंत्र्यांबद्दल काही तक्रारी आहेत का, अशीही त्यांनी विचारणा केली. त्यावेळी उपस्थित शहरातील पदाधिकाऱ्यांनी काहीच तक्रारी नसल्याचे त्यांना सांगितले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख