कोल्हेंच्या आधीच आढळरावांनी साधला रस्त्याच्या उद्‌घाटनाचा मुहूर्त

नारायणगाव व खेड घाट बाह्यवळण रस्त्याचे काम मागील पाच वर्ष प्रलंबित होते.
  Inauguration of Narayangaon Khed Road by former MP Shivajirao Adhalrao Patil  .jpg
Inauguration of Narayangaon Khed Road by former MP Shivajirao Adhalrao Patil .jpg

नारायणगाव : पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नारायणगाव व खेड घाट बाह्यवळण रस्त्याचे उद्‌घाटन शनिवारी (ता. १७ जुलै) खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्याचे नियोजन होते. या कार्यक्रमाचा सुगावा लागताच शुक्रवारी (ता. १६ जुलै) सायंकाळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या बाह्यवळण रस्त्याचे उद्‌घाटन करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. या माध्यमातून खासदार डॉ. कोल्हे यांच्यावर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कुरघोडी केली आहे. (Inauguration of Narayangaon Khed Road by former MP Shivajirao Adhalrao Patil) 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना बाह्यवळण रस्त्याच्या श्रेयवादावरून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमधील राजकीय वातावरण मात्र, तप्त झाले आहे. नारायणगाव व खेड घाट बाह्यवळण रस्त्याचे काम मागील पाच वर्ष प्रलंबित होते. आढळराव पाटील खासदार असताना २०१९ पूर्वी या बाह्यवळणासाठी भूसंपादन करून रस्त्याचे काम सुरू झाले. नारायणगाव बाह्यवळणाचे सुमारे ऐंशी टक्के काम पूर्ण झाले असताना ठेकेदार काम सोडून गेला. या रस्त्याचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने पुणे नाशिक महामार्गावर वाहतूकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. याचा फटका लोकसभा निवडणुकीत आढळराव पाटील यांना बसला. 

दरम्यान डॉ. अमोल कोल्हे खासदार झाले. रोडवेज सोल्युशन कंपनीला हे काम देण्यात आले. कोरोनामुळे एक वर्ष काम पुन्हा बंद झाले. अनेक अडथळे पार करत नारायणगाव व खेड घाट बाह्यवळण रस्त्याचे काम पूर्ण झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उद्‌घाटनाचा मुहूर्त काढण्यात आला. त्या नुसार शनिवारी (ता.१७) सकाळी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते व आमदार दिलीप मोहिते, अतुल बेनके, बाजार समितीचे सभापती संजय काळे, विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके यांचे उपस्थितीत उद्‌घाटन करण्याचे निश्चित झाले. 

निमंत्रण पत्रिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री यांचे फोटो होते. या बाबतची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर आज सकाळी व्हायरल झाली. मात्र, या रस्त्याच्या मंजुरीसाठी विशेष योगदान असलेले माजी खासदार आढळराव पाटील यांचा नामोल्लेख निमंत्रण पत्रिकेत टाळण्यात आल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते संतप्त झाले. सोशल मीडियावर खासदार डॉ. कोल्हे यांना मोठया प्रमाणात ट्रोल करण्यात आले. त्या नंतर वेगवान राजकीय घडामोडी घडून अखेर सायंकाळी माजी खासदार आढळराव पाटील यांनी दोन्ही बाह्यवळण रस्त्याचे उद्‌घाटन करून खासदार डॉ. कोल्हे यांच्यावर कुरघोडी केली. यामुळे शनिवारी खासदार डॉ. कोल्हे पुन्हा या रस्त्याचे उद्‌घाटन करतात का याकडे लक्ष लागले आहे.

खेड ते सिन्नर या महामार्गाच्या मंजुरीसाठी व काम पूर्ण करण्यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचेच योगदान आहे. असे असताना उद्घाटनापासुन त्यांना डावलण्यात आल्याने आज उद्घाटन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जुन्रर शिवसेना तालुका प्रमुख माउली खंडागळे यांनी सांगितले. 

Edited By - Amol Jaybhaye   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com