किराणा दुकानदार बनल्या पंचायत समितीच्या सभापती 

फरांदे यांच्या रूपाने बारामतीच्या पश्‍चिम भागातून प्रथमच एक महिला सभापतिपदी विराजमान झाली आहे.
Election of Nita Farande as the Chairperson of Baramati Panchayat Samiti
Election of Nita Farande as the Chairperson of Baramati Panchayat Samiti

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : किराणा दुकानदार, महिला बचत गटाच्या अध्यक्षा ते बारामतीसारख्या राज्यातील नामवंत तालुक्‍याच्या सभापती असा प्रवास नीता फरांदे यांनी करून दाखवला आहे. कुठलाही राजकीय वारसा नसताना सामान्य कुटुंबातील महिलेचा हा प्रवास अन्य महिलांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. तसेच, फरांदे यांच्या रूपाने बारामतीच्या पश्‍चिम भागातून प्रथमच एक महिला सभापतिपदी विराजमान झाली आहे. 

बारामती तालुक्‍यातील मुरूम येथील नीता फरांदे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार गुरुवारी (ता. 18 मार्च) पंचायत समितीच्या सभापती पदाची संधी मिळाली. त्या जानेवारी 2016 मध्ये पंचायत समितीवर सर्वाधिक मतांनी निवडून आल्या होत्या. त्या सातारा जिल्ह्यातील अणेवाडी येथील अत्यंत गरीब कुटुंबातील आहेत. लग्नानंतर मुरूम येथे त्यांनी पतीसह निकिता किराणा स्टोअर्स हे दुकान सुरू केले आणि चांगले चालवून जनसंपर्क वाढवला. 

शेती फारशी नसल्याने दुकानाला जोडव्यवसाय म्हणून शेवया तयार करणे, शिलाई यंत्र चालवणे अशीही कामे त्या करतात. याशिवाय नवप्रगती हा वीस महिलांचा, तर श्रीगणेश हा 80 महिलांचा बचत गटही त्या सहकारी महिलांसह चालवतात. त्यांचे पती नारायण फरांदे हे सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांच्या अजयश्री दूध संस्थेचे काम सांभाळतात. 

फरांदे ह्या मुरूम ग्रामपंचायतमध्ये 2012 ते 2017 ह्या कालावधीसाठी सदस्य म्हणून निवडून आल्या. एक वर्ष उरलेले असताना आणि ध्यानीमनी नसताना राजवर्धन शिंदे यांच्या माध्यमातून अजित पवार यांचा पंचायत समितीस अर्ज भरण्याचा निरोप आला. निवडून आल्यानंतर पंचायत समितीच्या कारभारात त्या सक्रिय राहिल्या. तसेच, गृहपयोगी वस्तू व शेतीपयोगी अवजारे शक्‍य तेवढ्या लोकांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न केला. 

आता खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच त्यांच्यावर सभापतिपदाची धुरा सोपविली आहे. बारामतीच्या पश्‍चिम पट्ट्यात आतापर्यंत रामराजे जगताप, शिवाजीराव भोसले, वसंतकाका जगताप ह्याच दिग्गजांना सभापतिपदाची संधी मिळाली होती. लक्ष्मण गोफणे, माऊली कदम, आत्माराम सोरटे उपसभापती बनले होते. मात्र, एकाही महिलेला तशी संधी मिळाली नव्हती. फरांदे यांच्या रूपाने ती संधी परिसराला मिळाली आहे. 

सामान्य कुटुंबातील माझ्यासारखी महिला केवळ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामुळेच सभापती बनू शकली. सहकारी सदस्यांच्या मदतीने अजितदादांनी टाकलेली जबाबदारी योग्य रितीने पार पडण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.  -नीता फरांदे, सभापती, बारामती पंचायत समिती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com