राष्ट्रवादी, 'एमआयएम'नंतर शिवसेनेत पेटला गटनेतेपदाचा वाद; भाजपला फटका बसण्याची चिन्हे 

तीन महिन्यांपूर्वीच अमोल शिंदे यांची नियुक्तीगटनेतेपदीकेली होती.
Dispute over post of group leader in NCP, MIM, Shiv Sena in Solapur Municipal Corporation
Dispute over post of group leader in NCP, MIM, Shiv Sena in Solapur Municipal Corporation

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेत अलीकडील काळात गटनेता निवडीवरून राजकारण रंगल्याचे दिसून येते. "एमआयएम'च्या अधिकृत गटनेत्यावरून येथील स्थायी आणि परिवहन समितीची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. "एमआयएम'बरोबरच राष्ट्रवादीच्याही गटनेत्याचा वाद आहे. आता त्यात शिवसेनेच्या गटनेत्याच्या वादाची भर पडली आहे. तीन महिन्यांपूर्वी नेमण्यात आलेल्या गटनेत्याला हटवून त्या ठिकाणी नव्या नगरसेवकाची शिवसेनेकडून नियुक्ती करण्यात आली आहे. 

महापालिकेतील शिवसेना गटनेतेपदावरून अमोल शिंदे यांना हटवून त्यांच्या जागी गणेश वानकर यांची नियुक्‍ती करण्यात आल्याचे पत्र शिवसेना शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर यांनी महापौरांना दिले आहेत. दरम्यान तीन महिन्यांपूर्वीच शिंदे यांची नियुक्ती ज्येष्ठ नगरसेवक महेश कोठे यांनी केली होती. वैध गटनेता कोण यावरून आता नवीन वादाला तोंड फुटले आहे. 

तत्पूर्वी एमआयएम गटनेत्याचा वाद विकोपाला गेल्याने त्याचा स्थायी-परिवहन सदस्य निवड पर्यायाने सभापती निवडीवर परिणाम झाला होता. एमआयएमच्या तक्रारीवरून सरकारने 5 मार्च रोजी सभापतिपदाच्या निवडीला स्थगिती दिली. त्यानंतर ही स्थगिती मागे घेऊन न्यायालयाच्या आदेशानुसार सभापतिपदाची निवडणूक होण्याच्या एक तासाआधी सरकारने स्थायी-परिवहन सदस्य निवडीचे ठराव निलंबन केले आहे. त्यामुळे सभापती निवडीची प्रक्रिया रद्द झाली आहे.

निलंबनाच्या कारवाईवर म्हणणे मांडण्यास संबंधितांना महिन्याची मुदत देण्यात आली आहे. यासंदर्भात सुनावणी होऊन निर्णय अपेक्षित आहे, मात्र सरकारच्या या कारवाईला उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा प्रयत्न भाजपकडून होणार आहे. 

एमआयएम, राष्ट्रवादी गटनेतेपदाचा वाद ताजा असतानाच आता त्यात शिवसेनेची भर पडली आहे. तीन महिन्यांपूर्वी अमोल शिंदे यांची गटनेता अर्थात महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली होती. पण आता 2 मार्चच्या शिवसेना सचिवांच्या पत्रानुसार गणेश वानकर हे नवीन गटनेता राहतील, असे पत्र शिवसेनेकडून महापौर, आयुक्त तसेच विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहे. त्यामुळे आता महापौरांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे. गटनेते वादाचा फटका भाजपला बसण्याची दाट चिन्हे आहेत. त्यामुळे आता सर्वच गटनेत्यांसंदर्भात सावध भूमिका घेण्याची वेळ भाजपवर आली आहे. 

गटनेत्यांच्या संदर्भातील अधिकार हे महापौरांना असल्याचे सांगण्यात येते. मात्र यावरून प्रवाद आहे. गणेश वानकर यांची गटनेतेपदी नियुक्तीचे पत्र महापौर कार्यालयात देण्यात आले आहे. याबाबत महापौर श्रीकांचना यन्नम काय भूमिका घेणार, याकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

एमआयएम, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि आता शिवसेना या तीनही पक्षाच्या गटनेत्यांबाबत वाद आहे. या वादाबाबत विधान सल्लागारांचा अभिप्राय घेण्यात येणार आहे, त्यानंतरच गटनेत्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. 
-श्रीकांचना यन्नम, महापौर, सोलापूर 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com