सरपंच, उपसरपंचांना गायरानातील अतिक्रमण भोवलं; चौघांचे पद रद्द 

ग्रामपंचायतीच्या निम्म्या सदस्यांना अपात्र ठरवल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
Devgaon's Sarpanch, Deputy Sarpanch including four  posts canceled by pune District Collector in encroachment case
Devgaon's Sarpanch, Deputy Sarpanch including four posts canceled by pune District Collector in encroachment case

पारगाव (जि. पुणे) : आंबेगाव तालुक्‍यातील देवगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व दोन महिला सदस्यांना शासकीय गायरानावर अतिक्रमण केल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी अपात्र ठरवले आहे. देवगाव ग्रामपंचायतीत लोकनियुक्त सरपंचांसह एकुण सात सदस्य आहेत, त्यापैकी चौघांना म्हणजे निम्म्या सदस्यांना अपात्र ठरवल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

मार्च 2019 मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत थेट जनतेतून योगिनी दिलीप खांडगे यांची सरपंचपदी निवड झाली होती. सरपंच योगिनी खांडगे, उपसरपंच दत्तात्रेय महादू खांडगे व ग्रामपंचायत सदस्या द्वारका मच्छिंद्र कोकणे यांच्या नातेवाईकांनी, तर ग्रामपंचायत सदस्या इंदुबाई विठोबा खांडगे यांनी स्वतः शासकीय गायरानावर अतिक्रमण केल्याने त्यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र ठरविण्यात यावे, असा अर्ज माजी सरपंच उज्ज्वला बाबाजी गावडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केला होता. 

उज्वला गावडे यांच्या अर्जावर जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सुनावणी घेतली. या सुनावणीत सरपंच योगिनी खांडगे यांच्या सासूबाई राधाबाई पाटीलबुवा खांडगे यांनी शासकीय गायरान गट क्रमांक 1/1मध्ये ग्रामपंचायत मिळकत क्रमांक 218 व 218/1 अतिक्रमण करुन बांधली आहे. तसेच, उपसरपंच दत्तात्रेय महादू खांडगे यांच्या पत्नी सुकेशिनी दत्तात्रेय खांडगे यांनी शासकीय गायरान गट क्रमांक 166 मध्ये ग्रामपंचायत मिळकत क्रमांक 204/1 व नोंद नसलेली एक मजली इमारत व त्यांच्या पुढे पत्राशेड अतिक्रमण करून बांधली आहे. 

ग्रामपंचायत सदस्या इंदुबाई विठोबा खांडगे यांची स्वतःच्या नावे असलेली ग्रामपंचायत मिळकत क्रमांक 211 ही शासकीय गायरान गट क्रमांक 166 मध्ये अतिक्रमण करुन बांधली आहे. ग्रामपंचायत सदस्या द्वारका मच्छिंद्र कोकणे यांच्या सासूबाई छबूबाई व कुसूमबाई लक्ष्मण कोकणे यांच्या नावे ग्रामपंचायत मिळकत क्रमांक 16 शासकीय गायरान गट क्रमांक 1/1 मध्ये अतिक्रमण करून बांधली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चारही ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरण्याची मागणी उज्वला गावडे यांनी केली होती. 

यावर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांचा या अतिक्रमण बाबतीत अहवाल मागवून घेतला. त्यानंतर सरपंच योगिनी खांडगे, उपसरपंच दत्तात्रेय खांडगे, ग्रामपंचायत सदस्या इंदुबाई खांडगे व द्वारका कोकणे यांना पदावर राहण्यास अपात्र ठरविण्यात येत आहे, असा निर्णय दिला. 

अनेकांचे धाबे दणाणले 

ग्रामपंचायत सदस्य अथवा एकत्रित कुटुंबातील त्याच्या जवळच्या नातेवाईकाने शासकीय जागेत अतिक्रमण केले असले तरीही त्याला अपात्र ठरवले जाते. या सर्वोच्य न्यायालयाच्या निकालानुसार देवगाव ग्रामपंचायतीचे सदस्य अपात्र ठरविण्याचा निर्णय झाला. या खळबळजनक निकालाने जानेवारीत आंबेगाव तालुक्‍यात झालेल्या 29 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या नातेवाइकांच्या नावे असलेल्या अतिक्रमणांचा विषय चर्चेत येण्याच्या शक्‍यतेने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com