उजनीतून इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय रद्द करण्यावर अजित पवार म्हणाले... - Deputy Chief Minister Ajit Pawar says about Indapur water | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

उजनीतून इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय रद्द करण्यावर अजित पवार म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 29 मे 2021

त्याबाबतच्या बातम्याही आल्या आहेत.

बारामती  ः उजनी धरणाच्या पाण्यासंदर्भात आपण सर्वांनी बघितलेलं आहे. त्याबाबतच्या बातम्याही आल्या आहेत. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उजनी धरणातून इंदापूरला पाच टीएमसी पाणी देण्याबाबची ऑर्डर रद्द केलेली आहे, असे उत्तर उजनी धरणाच्या पाण्याबाबत काय या प्रश्नावर अजित पवार यांनी दिले. (Deputy Chief Minister Ajit Pawar says about Indapur water)

बारामतीत आज (ता. २९ मे) कोरोनासंदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीनंतर पवार माध्यमांशी बोलत होते. पुणे, पिंपरी चिंचवड शहरातून वाहून येणाऱ्या सांडपाण्यातून पाच टीएमसी पाणी उजनीतून इंदापूरला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यावर सोलापूर जिल्ह्यात मोठा गदारोळ झाला. सर्वपक्षीयांकडून या निर्णयाला कडाडून विरोध करण्यात आला. विविध संघटनांनी याबाबत आंदोलने केली होती. सोलापूर जिल्ह्यातील वाढता विरोध पाहून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तो निर्णय रद्द केल्याची घोषणा केली होती. त्याबाबत पवारांना विचारण्यात आल्यानंतर त्यांनी वरील उत्तर दिले. 

हेही वाचा : वाझे, देशमुख गेले; आता अनिल परब आणि जितेंद्र आव्हाडांचा नंबर

ते म्हणाले कोरोनावर मात करण्याच्या उपाय योजनांना राज्य सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिलेले आहे. तिसरी लाट येणार या बाबतही चर्चा सुरु आहे. लहान मुलांना या संकटापासून दूर ठेवण्यासाठी सर्वतोपरी तयारी करण्याचे नियोजन केलेले आहे. ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण होण्याबाबतही राज्य सरकारने प्रयत्न केलेले आहेत. रुग्णवाहिकांची संख्या वाढवण्यासह मुलभूत सुविधांसाठी निधीही उपलब्ध करुन दिला आहे.

लसीकरणाचा कार्यक्रम सरकारला तातडीने व मोठ्या प्रमाणावर राबवायचा आहे, या कामासाठी साडेसहा हजार कोटी रुपयांची तरतूदही सरकारने केली आहे, मात्र दुर्देवाने देशात ज्या कंपन्या लस तयार करतात, त्यांच्याकडून तेवढ्या मोठ्या प्रमाणावर पुरवठा होत नाही; म्हणून मोफत लसीकरण कार्यक्रमाला अडचणी येत आहे. या मध्ये आम्ही केंद्राला विनंती केली आहे की परदेशातील ज्या मान्यताप्राप्त लशी आहेत, अशा लशी भारतात आणणे व लोकांना देण्याची परवानगी द्यावी, असेही त्यांनी सांगितले. 

अजित पवार म्हणाले की, कृषीपूरक दुकाने उघडण्याची सरकारने परवानगी दिली आहे. शेतकऱ्यांना अडचणी येऊ नये, याची काळजी आम्ही घेत आहोत. कोरोनाकाळात आपला विकासदर कृषी क्षेत्राने सांभाळण्याचेच काम केले आहे. यंदा पाऊस चांगला आहे, असे हवामान खात्याने सांगितले आहे. सर्व शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने कर्जही उपलब्ध करुन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख