खेड, जुन्नरमधील शिवसेना उमेदवारांचा पराभव आढळरावांमुळेच  

कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबतच्या अनैसर्गिक युतीने पक्ष संपून जाईल, त्याची आता काळजी करावी.
Defeat of Shiv Sena candidates in Khed, Junnar was due to Shivajirao Adhalrao :  Bhegade
Defeat of Shiv Sena candidates in Khed, Junnar was due to Shivajirao Adhalrao : Bhegade

शिक्रापूर (जि. पुणे) : विधानसभा निवडणुकीत खेड आणि जुन्नरमधील शिवसेनेचे उमेदवार हे केवळ माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावरील पक्षांतर्गत राजकीय नाराजीमुळे पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यांनी या दोन्ही तालुक्यांमधील राजकीय पराभवाला भाजपला दोष देणे बंद करावे. उलटपक्षी त्यांच्याच पक्षाचे आमदार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विशेष मर्जीतील प्रताप सरनाईक यांचा लेटरबॉंम्ब काय म्हणतोय, त्याचे चिंतन करावे.

कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबतच्या अनैसर्गिक युतीने पक्ष संपून जाईल, त्याची आता काळजी करावी. आम्ही तर सरनाईक यांच्या भावनांचे स्वागत केले आहे, तुम्ही करायचे की नाही, ते आता तुम्ही ठरवा, असे म्हणत भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांना एका व्हिडिओच्या माध्यमातून चिमटा काढला. (Defeat of Shiv Sena candidates in Khed, Junnar was due to Shivajirao Adhalrao : Ganesh Bhegade) 

शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरूर मतदारसंघाचे तीन वेळा खासदार होते. चौथ्या वेळी त्यांना राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. पराभवानंतरही ते मतदार संघातील विविध गावे आणि मोठ्या शहरांतील सर्व पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या ते आजही संपर्कात आहेत. अर्थात, त्यांचा राजकीय बाण राष्ट्रवादीवर जोरात चालतो. पण, भाजपलाही ते अधून-मधून चिमटे काढीत असतात. 

मागील आठवड्यात त्यांनी भाजपने विधानसभा निवडणुकीत जुन्नर व खेड तालुक्यात शिवसेनेच्या विरोधातील उमेदवारांना ताकद दिल्याचा आरोप करत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व खासदार गिरीश बापट यांच्यावर निशाना साधला होता. त्याला प्रतिउत्तर म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी ‘सरकारनामा’शी संवाद साधून आढळरावांना टोला लगावला. 

भेगडे यांनी म्हटले आहे की, शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांना भाजपसोबतच्या युतीचे महत्व समजले आहे. हिंदुत्वाशी नाळ बांधलेल्या शिवसेना-भाजपमधील पदाधिकाऱ्यांचे सख्य अद्यापही कमी झालेले नाही. सरनाईकांच्या भूमिकेनंतर चंद्रकांत पाटील व गिरीश बापट यांनी काही कृत्रिम लोकांमुळे युती तुटल्याची प्रतिक्रिया दिली होती. त्यावर आढळरावांनी खेड व जुन्नरमधील राजकारणाची माहिती देत काही विरोधी मते व्यक्त केली होती.

त्यानंतर भेगडे यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या लढाऊ नेत्या आशा बुचके यांना पक्षातून बाहेर काढण्याचे काम आढळराव-पाटील यांनी केले. त्यामुळे बुचके ह्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. त्यांना पक्षातून का काढले, त्यांना निवडणुकीत उतरण्यापासून का रोखले नाही, याचा खुलासा आढळरावांनी करायला हवा. 

खेडमध्ये भाजपचे तत्कालीन तालुकाध्यक्ष अतुल देशमुख निवडणुकीत उतरण्यास तेथील स्थानिक राजकारण कारणीभूत होते. राजगुरुनगर नगरपालिकेतील नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपा ८, कॉंग्रेस-राष्ट्रवादी ८ आणि शिवसेनेचे २ असे नगरसेवक असताना शिवसेनेने भाजपला साथ द्यायला हवी होती. मात्र तेथेही आढळराव-पाटलांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला साथ दिली.

आळंदीतील भाजप नगरसेवकाच्या मृत्यूनंतरच्या पोटनिवडणुकीत इतर पक्षांनी या नगरसेवकाच्या पत्नीसाठी उमेदवार दिला नाही. मात्र, शिवसेनेने उमेदवार उतरवून भाजपला नामोहरम करण्याची संधी सोडली नाही. त्यानंतरही त्या ठिकाणी आम्हीच जिंकलो. मात्र, आढळराव-पाटलांचा भाजपविरोधी हट्ट आड आला. त्यामुळे खेड व जुन्नरमधील पराभवाचे खापर भाजपवर फोडण्यापेक्षा त्यांनी आता प्रताप सरनाईकांच्या मागणीचे स्वागत करायचे की अन्य काही करायचे ते त्यांनी ठरवावे, असे भाजप जिल्हाध्यक्ष भेगडे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी तुम्हाला पुन्हा लोकसभेत जाऊ देणार नाही

अजूनही वेळ गेलेले नाही. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नादी लागून शिवसेना संपवायची का याचे चिंतन सुरू करा. कारण, तुमच्या आंबेगावमध्येच गृहमंत्रीपद देवून राष्ट्रवादीने जो तुम्हाला संपविण्याचा विडा उचलला आहे, तो तुम्हाला पुन्हा लोकसभेत जाऊ देईल, असे आम्हाला तरी वाटत नाही. विचार करा आणि प्रताप सरनाईकांच्या मागणीचे स्वागत करायचे की नाही, ते तुम्हीच ठरवा आणि जाहीर करा, असे खुले आव्हान भेगडे यांनी आढळराव पाटील यांना केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com