पवारांचे कौतुक करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्याचा फैसला मातोश्रीवर होणार  

आगामी काळात शिरूर हवेलीतील शिवसेनेत मोठे बदल होणारआहेत.
Big changes in Shirur-Haveli Shiv Sena soon
Big changes in Shirur-Haveli Shiv Sena soon

शिक्रापूर (जि. पुणे) : शिरूर-हवेलीमधील शिवसेनेच्या बंडावर माजी खासदार तथा उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे तब्बल दोन तास चर्चा झाली. पक्षाचे जिल्हा सल्लागार अनिल काशिद आणि उपजिल्हाप्रमुख पोपट शेलार यांच्या राजीनाम्याचा विषय ‘मातोश्री’च्या कोर्टात पाठविण्याचे ठरले. राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांचे कौतुक करणारे आणि पक्षांतर्गत वादात असणारे पदाधिकारी या बैठकीच्या केंद्रस्थानी होते. दरम्यान, आगामी काळात शिरूर हवेलीतील शिवसेनेत मोठे बदल होणार असल्याचे जिल्हाप्रमुख माऊली कटके यांनी सांगितले. (Big changes in Shirur-Haveli Shiv Sena soon)
              
जातीवाचक बोलणे, गर्दी जमविण्यासाठी जात आडवी येत असल्याची वक्तव्ये करणे, राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांचे शिवसेनेच्या सोशल मीडीयाच्या पेजवर कौतुक करणे, जवळच्या लोकांना संघटनेत स्थान देणे, पक्षप्रमुखांच्या विरोधात बोलणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या विरोधातील आंदोलनाला विरोध करणे आदी विषय आजच्या (ता. १२ सप्टेंबर) बैठकीची अजेंडा होता. शिरुर आणि हवेली तालुक्यांतील सर्व प्रमुख शिवसेना पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. 

जिल्हाप्रमुख माऊली कटके, वादाच्या केंद्रस्थानी असलेले शिरूरचे तालुकाप्रमुख सुधीर फराटे, जिल्हा सल्लागार अनिल काशिद व उपजिल्हाप्रमुख पोपट शेलार यांच्या उपस्थितीत ही बैठक तब्बल दोन तास चालली. बैठकीत प्रत्येक मुद्द्यांवर चर्चा होवून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र, काशिद, शेलार यांच्या राजीनाम्याबद्दल कुठलाही निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे दोघांचेही राजीनामे मातोश्रीवर निर्णयासाठी पाठविण्याचा एकमुखी निर्णय झाला. त्यानुसार या दोघांचे राजीनामे लवकरच मातोश्रीवर पाठविले जातील. तेथील निर्णयानुसार पुढील कार्यवाही होणार असल्याचे कटके यांनी सांगितले. 

शिरुर-हवेलीतील काही शिवसैनिक हे पक्षविरोधी भूमिका घेतात, काहीजण थेट महाआघाडी म्हणत राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या संपर्कात राहतात. राजकारणात एकमेकांशी संवाद ठेवावा लागत असला तरी तो शिवसेना पक्षसंघटनेला घातक होणार नाही ना, याची दक्षता प्रत्येक शिवसैनिकांनी घ्यावी. शिरुर-हवेलीच्या शिवसेनेत मोठे फेरबदल केले जाणार आहेत. अन्य पक्षांचे, त्यांच्या नेत्यांचे कौतुक आणि समर्थन यापुढे सहन केले जाणार नाही, असा संदेश कार्यकर्त्यांमध्ये जावा, यासाठी गांभीर्याने पावले उचलण्याचा निर्णयही या वेळी उपनेते आढळराव यांच्या सुचनेनुसार घेतल्याचेही कटके यांनी नमूद केले.

त्यांच्यावर विशेष वॉच ठेवणार 

शिवसेनेचे काही पदाधिकारी भाजपच्या, तर काही राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. मुळात भाजप आणि राष्ट्रवादीचेही काही पदाधिकारी शिवसेनेत येण्यासाठी इच्छुक आहेत. या सर्व घडामोडींवर आमचे लक्ष असून आढळराव पाटील यांच्या सुचनेनुसार अशा काही नेत्यांची यादी तयार करून त्यावर विशेष वॉच ठेवला जाणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख कटके यांनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com