पिंपरी : स्थायी समिती सदस्य निवडीवरून पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेत सुरू झालेले वादळ गटनेतेपदाचा राजीनामा घेतल्यानंतरही शमलेले नाही. उलट, ह्या नाराजी, कुरघोडी व गटबाजीचा दुसरा अंक आता सुरू झाला आहे. लोकसभा व विधानसभाला पक्षाच्या उमेदवाराविरोधात काम केलेल्या नगरसेविकेला स्थायी सदस्यत्व बहाल केल्याने त्यांचा स्थायीचा राजीनामा घेण्याची मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख, महिला आघाडीच्या शहरप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांनी केली आहे. या प्रकरणावरून पक्षाच्या नगरसेवकांमध्ये नाराजी असून त्याचा मोठा फटका आगामी पालिका निवडणुकीत बसू शकतो, असा घरचा आहेरही त्यांनी दिला आहे.
पक्षश्रेष्ठींनी सुचविलेले अश्विनी चिंचवडे यांचे नाव डावलून शिवसेनेचे पिंपरी पालिकेतील गटनेते राहुल कलाटे यांनी आपल्या मर्जीतील नगरसेविका मीनल यादव यांची वर्णी गेल्या महिन्यात स्थायी समितीवर लावली होती. त्याबद्दल पक्षशिस्त मोडल्याचा ठपका ठेवत नुकताच कलाटे यांचा राजीनामा पक्षाने घेतला. मात्र, तो घेण्यास विलंब झाल्याबद्दल पक्षातील नाराजी व गटबाजी उफाळून आली होती. शहरप्रमुख योगेश बाबर, शहर महिला संघटिका ऊर्मिला काळभोर व जिल्हाप्रमुख (मावळ) गजानन चिंचवडे यांनी नुकत्याच काढलेल्या प्रसिद्धीपत्रकाने त्याला स्पष्ट दुजोरा दिला आहे.
हेही वाचा : होय, शरद पवारांनी आपल्याला उमेदवारीबाबत विचारणा केली होती
त्यात त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. नगरसेविका यादवच नाही, तर त्यांचे पती विभागप्रमुख विशाल यादव यांनी लोकसभा व नंतरच्या विधानसभा निवडणुकीला पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात काम केल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे अशा व्यक्तीला स्थायी सदस्यत्व बहाल केल्याने इतर नगरसेवकांमध्ये नाराजी आहे. त्याची मोठी किंमत आगामी पालिका निवडणुकीत पक्षाला मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. काही नगरसेवक इतर पक्षांच्या संपर्कात असून ते पक्ष सोडण्याच्या विचारात आहेत, असा लेटरबॉम्बही त्यांनी टाकला आहे.
मुख्यमंत्र्यांना त्रास देणाऱ्या भाजपला सोबत का घेतले? खैरे नाराज https://t.co/zvKxxkKr2i @ChandrakantKMP @iambadasdanve @AbdulSattar_99 #राजकीय #महाराष्ट्र #Sarkarnama #Viral #ViralNews #राजकारण #MarathiNews #MarathiPoliticalNews #ShivSena
— Sarkarnama (@SarkarnamaNews) March 19, 2021
दरम्यान, पदाधिकाऱ्यांचे सर्व आरोप मीनल यादव यांनी शुक्रवारी (ता. 19 मार्च) "सरकारनामा'शी बोलताना फेटाळून लावले. मी व माझे पती कट्टर शिवसैनिक असून आमचे काम बोलतंय व तेच बोलेल, असे म्हणत त्यांनी या वादापासून चार हात दूर रहाणेच पसंत केले.

