जगताप, लांडगेंच्या मतदारसंघातील मैदानांवर कोविड रुग्णालये उभारणीस ब्रेक

त्यामुळे करदात्यांचे काही शेकडो कोटी रुपये वाचले आहेत.
जगताप, लांडगेंच्या मतदारसंघातील मैदानांवर कोविड रुग्णालये उभारणीस ब्रेक
Pcmc Adminisrtaion has halted the process of installation of covid hospital on open ground

पिंपरी  ः पिंपरी-चिंचवडच्या दोन्ही कारभारी भाजप आमदारांच्या मतदारसंघात मोकळ्या मैदानात चारशे बेडची कोविड रुग्णालये (covid hospital) उभारण्याच्या प्रक्रियेला प्रशासनाने ब्रेक लावला आहे. त्यामुळे करदात्यांचे काही शेकडो कोटी रुपये वाचले आहेत. बुधवारच्या (ता. १२ मे) स्थायी समितीच्या बैठकीत लाखो रुपयांची बिदागी देऊन या रुग्णालयांसाठी सल्लागार (consultant) नेमण्याचा व सव्वा कोट रुपये अनामत म्हणून भरण्याचा विषय मागे घेण्यात आला. त्यामुळे यातून टक्केवारी मिळणाऱ्यांची घोर निराशा झाली आहे. (Pcmc Adminisrtaion has halted the process of installation of covid hospital on open ground)

या मलईदार विषयाला मोठा विरोध झाला होता. खुद्द पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या महिन्यात पिंपरी पालिकेतील कोरोना आढावा बैठकीत गरज वाटली, तरच मोकळ्या इमारतींमध्ये ही रुग्णालये उभारण्याची सूचना केली होती.

दरम्यान, शहरातील कोरोनाचा कहरही तुलनेने थोडा कमी झाला आहे. दुसरीकडे त्यामुळे काही शेकडो ऑक्सिजन बेड उपलब्ध झालेत. परिणामी ही रुग्णालये उभारणीची तूर्त तातडीची गरज नसल्याने पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी ती प्रक्रिया थांबवली आहे. त्याला त्यांनी स्वतः व अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनीही ‘सरकारनामा’शी बोलताना आज दुजोरा दिला.

प्रशासन तथा आयुक्तांनी सूज्ञ व योग्य निर्णय घेतल्याने त्याचे भोसरीतील भाजपचे नगरसेवक रवी लांडगे यांनी  स्वागत व कौतुक केले आहे. त्यांनी ४ मे रोजी आयुक्तांची भेट घेऊन ही रुग्णालये मैदानात उभारण्यास प्रथम विरोध केला होता. शहरात पालिकेच्या शाळांच्या मोकळ्या विस्तीर्ण इमारती तसेच मंगल कार्यालये सध्या रिकामी असताना तेथे ही रुग्णालये उभारण्याऐवजी मैदानात ती करण्याचा अट्टाहास हा ठेकेदारांच्या भल्यासाठी असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर भोसरीचे माजी आमदार व राष्ट्रवादीचे शहरातील ज्येष्ठ नेते विलास लांडे, याच पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक व माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनीही असाच विरोध आणि मत व्यक्त केले होते. 

गेल्या वर्षी शहरात मोकळ्या मैदानात उभारण्यात आलेल्या अशा रुग्णालयात पावसाळ्यात पाणी घुसल्याने ते दोन महिने बंद ठेवावे लागले होते, याकडे त्यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर भोसरीतीलच भाजपच्या नगरसेविका प्रियंका बारसे यांनी, तर आपल्या आदर्श शिक्षण संस्थेची विस्तीर्ण मोकळी इमारत कोविड सेंटरसाठी पालिकेला मोफत देऊ केली होती. पण, आयुक्तांनी तूर्त त्याची गरज नसल्याचे सांगितले होते. तेथेच मैदानातील कोविड रुग्णालयांना ब्रेक लागल्याचे संकेत मिळाले होते. परवा, त्यावर स्थायी समितीत परवा शिक्कामोर्तब झाले. 

सांगवीचे पीडब्ल्यूडी, तर भोसरीच्या गावजत्रा मैदानावरील रुग्णालयांसाठी सल्लागार नेमणे व  सांगवीतील रुग्णालयाला वीजपुरवठा करण्यासाठी एक कोटी ३१ लाख रुपये अनामत ठेवण्यााचे विषय प्रशासनाने मागे घेतले. या दोन्ही रुग्णालयांच्या फक्त वीज यंत्रणेवर साडेसात कोटी रुपये खर्च होणार होता.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in