राष्ट्रवादीच्या नगरसेविका अडचणीत; विभागीय आयुक्तांचे कारवाईचे आदेश

नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी शिवसेनाप्रणित युवासेनेचे पुणे जिल्हा संघटक जितेंद्र ननावरे यांनी केली होती.
राष्ट्रवादीच्या नगरसेविका अडचणीत; विभागीय आयुक्तांचे कारवाईचे आदेश
Sulakshana Shilwant Dhar .jpg

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर यांच्या कुटुंबियांनी पालिकेच्या निविदा प्रक्रियेत भाग घेऊन, महापालिका कायद्याचा भंग केल्याच्या तक्रारीवर कार्यवाही करण्याचा आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पिंपरी पालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिला आहे. यामुळे धर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे आता आयुक्त काय कारवाई करतात, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

धर यांनी अप्रत्यक्षपणे का होईना निविदा प्रक्रियेत भाग घेऊन आर्थिक लाभ घेतला असल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी शिवसेनाप्रणित युवासेनेचे पुणे जिल्हा संघटक जितेंद्र ननावरे यांनी केली होती. धर यांचे पती आणि दोन बंधू संचालक असलेल्या खासगी कंपनीने मास्क पुरविण्याची पालिकेची निविदा भरून एक लाख मास्कचा पुरवठा कोरोना काळात केला आहे. पालिका अधिनियमानुसार नगरसेवकाला प्रत्यक्ष वा कुणामार्फत अप्रत्यक्ष सुद्धा निविदा प्रक्रियेत भाग घेऊन आर्थिक लाभ घेता येत नाही. 

तसे आढळल्यास त्याचे पद रद्द होते. या कलमाचा आधार घेत धर यांचे पद रद्द करून त्यांनी पालिकेकडून घेतलेले लाभ वसूल करण्याची मागणी ननावरे यांनी पत्रकार परिषदेत १० मार्चला केली होती. तसेच त्याबाबत विभागीय आयुक्तांना लेखी तक्रारही दिली होती. दरम्यानच्या काळात राव हे कोरोनाग्रस्त झाल्याने त्यांच्याकडून या तक्रारीवरील कार्यवाहीला किंचित उशीर झाला. गेल्या २६ मार्चला त्यांच्या कार्यालयाकडून पिंपरी आयुक्तांना उचित कार्यवाहीचे पत्र जारी करण्यात आले.

प्रत्यक्षात ते सुद्धा उशीरानेच म्हणजे ३० तारखेला ननावरे यांना प्राप्त झाले. आयुक्तांनी कार्यवाही करून तक्रारदारांना कळवावे, असे त्यात सांगण्यात आले आहे. दरम्यान, आता भांडार, लेखा आणि विधी विभागाचे मत मागवून काय कारवाई करता येईल, याची चाचपणी आयुक्तांनी सुरु केल्याचे समजते. कायद्यानुसार कारवाई झाली, तर धर यांचे पद रद्द होऊ शकते, असा दावा ननावरे यांनी केला आहे. तर, धर यांचे पती व भावांनी निविदेत भाग घेतल्याने संशयाचा फायदा त्यांना दिला जातो का याकडेही पालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 
 
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in