पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या भाजप महापौर माई ढोरे यांनी सोमवार (ता.२२ फेब्रुवारी) आयोजित केलेल्या मिस आणि मिसेस पिंपरी चिंचवड या कार्यक्रमात कोरोना नियमावली पायदळी तुडवण्यात आल्याने महापौर अडचणीत सापडल्या आहेत. याबाबत तक्रार आल्यास गुन्हा दाखल करू,असे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी आज सांगितले. तर, या प्रकरणावरून राष्ट्रवादीने महापौरांच्या राजीनाम्याचीच मागणी केली आहे. या सौंदर्य स्पर्धेत महापौरांनी विनामास्क कॅटवॉक केला होता.
शहराचे कारभारी आणि भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त (ता.१५ फेब्रुवारी) महापौरांनी ही सौंदर्य स्पर्धा सोमवारी (ता.२२ फेब्रुवारी) आयोजित केली होती. त्यात मास्क न वापरणाऱ्या ३२ जणांना पोलिसांनी दंड केला आहे.
मोदी सरकारच्या काळात पेट्रोल, डिझेलने नोंदवला एेतिहासिक विक्रम! जाणून घ्या नेमका काय...
यावेळी सोशल डिस्टंसिंगचाही फज्जा उडाला होता. त्यामुळे ही कोरोना नियमावली पायदळी तुडवल्याबद्दल जसा पुण्यात (हडपसर) येथे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला, तसा महापौरांविरद्ध करणार का अशी विचारणा पोलिस आयुक्तांना केली असता हा पालिकेचा विषय असून, मात्र त्याबाबत तक्रार आल्यास कारवाई करू,असे त्यांनी स्पष्ट केले.
कोरोनाने पुन्हा उचल खाल्यानंतर सध्या कुठल्याही कार्यक्रमाला दोनशेची मर्यादा घालण्यात आली आहे. मात्र, महापौरांच्या कार्यक्रमाला ती पाळण्यात आली नाही. दोनशेपेक्षा दुप्पटीहून अधिक मंडळी त्याला उपस्थित होती. त्यांनी सोशल डिस्टसिंग पाळले नाही. एवढेच नाही, तर अनेकांनी मास्कही घातले नव्हते. त्यावरून राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महापौरांवर हल्लाबोल करणारी तीन ट्विट आज केली.
हे लक्षात घेता,कोरोनाचे नियम मोडल्यावर प्रशासनाकडून सर्वसामान्य जनतेवर कारवाई होते,तशीच कारवाई महापौरांवरही व्हायला हवी. @CMOMaharashtra@AjitPawarSpeaks @AnilDeshmukhNCP @Dev_Fadnavis @ChDadaPatil @PCMC_Pune@abpmajhatv @TV9Marathi @saamTVnews @News18lokmat @bbcnewsmarathi
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) February 23, 2021
त्यात ते म्हणाले की, वाढत्या कोरोनामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनानंतर अनेक राजकीय व्यक्तींनी आपले पुर्वनियोजित कार्यक्रम पुढे ढकलले. स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी पुण्यात बैठक घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध जाहिर केले. मुख्यमंत्र्यांनी त्याच दिवशी सायंकाळी सोशल माध्यमातून जनतेशी संवाद साधला. तरीही पिंपरी-चिंचवडच्या महापौरांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या आवाहनाकडे सपशेल दुर्लक्ष करत 'फॅशन शो' आयोजित करत नागरिकांचा जीव धोक्यात घातला, हे अतिशय खेदजनक आहे.
गुंड मारणेचा फोटो, व्हिडीअो लाईक केला तरी गुन्हा दाखल होणार
त्यात सोशल डिस्टन्सिंग व कोरोनाविषयी शासनाने निर्धारित केलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून येत आहे. हे लक्षात घेता, कोरोनाचे नियम मोडल्यावर सर्वसामान्यांवर कारवाई होते, तशी ती महापौरांवरही व्हायला हवी.
तर, राष्ट्रवादीच्या माजी महापौर आणि ज्येष्ठ नगरसेविका मंगला कदम यांनी सर्वसामान्यांना जसा मास्क वापरला नाही, तर दंड होतो, तसा तो महापौरांनाही करावा. तसेच झाल्या प्रकाराबद्दल त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात त्या म्हणतात, महापौरांच्या या कार्यक्रमात भाजपच्या एका पदाधिकाऱ्यानेही मास्क घातलेला नव्हता. सभागृहामध्ये सोशल डिस्टंन्स न पाळता सभागृहाच्या क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झालेली होती.
शहरात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी साहित्य खरेदीमध्ये भाजपने भष्ट्राचार केला व आता कोरोना प्रसार करण्यासही भाजपचे महापौर व पदाधिकारीही जबाबदार आहेत. शहरातील सर्वसामान्य नागरीकांना मास्क परीधान केला नाही तर त्याला मनपा प्रशासन ५०० रुपये दंड करते आता शहराच्या प्रथम नागरिक असणा-या महापौर यांच्यावरदेखील सर्वसामान्य नागरीकांप्रमाणेच कारवाई करण्यात यावी. तसेच त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यावा. ज्या भाजप नगरसदस्यांनी मास्क परीधान केला नव्हता त्यांच्यावरही कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
Edited By - Amol Jaybhaye

