गुंड मारणेचा फोटो, व्हिडीओ लाईक केला तरी गुन्हा दाखल होणार
gaja marne land cruiser ff

गुंड मारणेचा फोटो, व्हिडीओ लाईक केला तरी गुन्हा दाखल होणार

मारणेला शोधण्यासाठी अनेक पथके मागावर

पुणे ः गुंड गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध पुणे पोलिसांनी आणखी कठोर कारवाई सुरू केली असून मारणेचा व्हिडीओ युट्युब, फेसबुक, इन्स्टाग्राम अशा सोशल मिडीयाद्वारे पसरविणाऱ्यांसह त्यास प्रतिसाद देऊन प्रतिक्रीया देणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मारणे व त्याच्या सहानुभूतीदारांना सोडणार नसल्याचा इशारा या निमित्ताने पुन्हा एकदा दिला आहे. मारणे सध्या फरार असून त्याचा शोध जोमाने सुरू आहे.

एखाद्या गुंडाने समाजात दहशत निर्माण करण्यासाठी व्हिडीओ क्‍लिप प्रसारित केली असेल किंवा त्याने प्रसारित केलेल्या व्हिडीओला लाईक करणे, त्यावर भाष्य करणे हा गुन्हा आहे. अशा कृतीमुळे गुंडांना प्रोत्साहन मिळते. त्यामुळे गुंडाच्या पाठराख्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला आहे. 

मारणे व त्याच्या साथीदारांनी केलेल्या खुनाच्या प्रकरणामध्ये न्यायालयाने त्याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर त्याच्या साथीदारांनी दोनशे वाहनांच्या ताफ्यातून त्यास मुंबईहून पुण्यात कोथरूड येथे आणले. त्यावेळी त्यांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर धुडगुस घातला, त्याचबरोबर त्या मिरवणुकीचे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरणही करण्यात आले. त्यामुळे मारणे व त्याच्या साथीदारांविरुद्ध खालापूर, शिरगाव, वारजे, कोथरूड, तळेगाव दाभाडे या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. मारणेच्या साथीदारांनी वापरलेल्या अलिशान गाड्या, ड्रोन कॅमेरा पोलिसांनी जप्त केले.

दरम्यान, मारणे आणि त्याच्या साथीदारांनी फेसबुक, युट्युब, इन्स्टाग्रामवर मिरवणुकीचे व्हिडीओ व्हायरल करून करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात मंगळवारी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड तपास करत आहेत. 

मारणे आणि साथीदारांविरोधात आणखी सात गुन्हे दाखल असून ते न्यायालयात प्रलंबित आहेत. या खटल्यातील साक्षीदार आणि तक्रारदारांवर दबाब निर्माण केल्याने त्याच्या विरोधात दाखल असलेल्या खटल्यात दोषमुक्त झाला. उच्च न्यायालयाने साक्षीदारांवर दबाब आणता येणार नाही, असे निवाडे दिले आहेत. मारणे याचे दहशत निर्माण करण्याचे कृत्य न्यायनिवाडे आणि मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारे आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in