खळबळजनक : स्फोट घडवून एटीएम फोडले अन्‌ लाखो रुपये लुटले  

हे नक्षलवाद्यांचे कृत्य असावे का?
In Chakan, an ATM machine was blown up with the help of explosives
In Chakan, an ATM machine was blown up with the help of explosives

पिंपरी : आतापर्यंत एटीएम मशीन कटरने कापून, फोडून वा ते चक्क पळवून नेऊन त्यातील पैसे लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, त्यात स्फोट घडवून त्यातील रोकड लुटल्याची घटना पिंपरी चिंचवड आयुक्तालयात येणाऱ्या चाकण एमआयडीसीत (ता. खेड, जि. पुणे) घडल्याने पोलिसही चक्रावून गेले आहेत. त्यात आईडीसारखे उच्च दर्जाचे स्फोटक वापरले गेल्याने हे नक्षलवाद्यांचे कृत्य असावे का? त्यात परप्रांतीय गुन्हेगार सामील आहेत का? याचाही चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक पोलिस, बीडीडीएस, गुन्हे शाखा यांच्याबरोबर एटीएसनेही याबाबत तपास सुरू केला आहे. (In Chakan, an ATM machine was blown up with the help of explosives)

दरम्यान, हे दोन्ही चोरटे घटनास्थळा जवळील एका चायनीज सेंटरच्या बाजूला असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. ओळख पटू नये; म्हणून त्यांनी चेहरा झाकून घेतला होता. मास्कही लावला होता. जाताना दुचाकी चालवणाऱ्या लुटारूने त्या ठिकाणी लावलेल्या कॅमेऱ्याला बिनधास्तपणे हातही दाखवला. दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याकडे सॅक असून त्यातच त्याने लुटीचे पैसे ठेवल्याचा अंदाज आहे. या दोघांनी आपल्यामध्ये एक पेटीही धरल्याचे दिसून येत आहे. तिच्या आधारेच त्यांनी रिमोट पद्धतीने हा स्फोट घडविला असावा, अशी शक्यता आहे.

या स्फोटामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. स्फोट ऐकून घटनास्थळी धाव घेतलेल्या एका स्थानिक तरुणाला एका लुटारूने इसको गोली मारो असे दुसऱ्याला सांगितल्याने ते परप्रांतीय असावेत, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

गुन्हेगारीच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असलेल्या म्हाळुंगे पोलिस चौकीच्या अखत्यारीत पुणे-नाशिक या २४ तास मोठी वर्दळ असलेल्या महामार्गानजीक भांबोली फाट्यावर ही स्फोटक घटना घडली आहे. त्यात अंदाजे तीस लाख रुपये चोरीला गेले आहेत. तर, दहा-बारा लाख रुपये घटनास्थळीच एटीएममध्येच पडल्याचे आढळले आहे. उच्च दर्जाच्या हिताची या जपानी कंपनीच्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या एटीएममध्ये हा स्फोट घडवून चोरी झाली आहे. मंगळवारी (ता. २०) मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास ही घटना घडली आहे. चाळीस लाख रुपये या एटीएममध्ये होते, अशी प्राथमिक माहिती आहे. दोनच दिवसांपूर्वी पुणे ग्रामीणमध्ये रांजणगाव या एमआयडीसी असलेल्या ठिकाणीही अशीच घटना घडली होती. त्यामुळे एकाच टोळीचे हे काम असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त होत आहे. 

या घटनेमुळे एटीएमच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अनेक ठिकाणच्या एटीएममध्ये पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याचे अजूनही दिसून येत आहे. काही ठिकाणी वॉचमन नसतो, तर काही ठिकाणी सीसीटीव्ही नाही. सीसीटीव्ही असलेल्या ठिकाणी तो बंद असल्याचे आढळले आहे. त्यामुळे असा हलगर्जीपणा करणाऱ्या बॅंकांविरुद्ध आता कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. 

एमआयडीसीतील माफिया राज व वाढत्या गुन्हेगारीमुळेच चाकण पोलिस ठाण्याचा समावेश १५ ऑगस्ट २०१८ रोजी स्थापन झालेल्या पिंपरी-चिंचवड पोलिस आय़ुक्तालयात करण्यात आला. त्यानंतरही तेथील गुन्हेगारी कमी झालेली नाही. उलट ती वाढलीच नाही, तर तिने आणखी तीव्र स्वरुप धारण केले असल्याचे या स्फोटक घटनेतून दिसून आले आहे. 

चाकण औद्योगिक वसाहतीतील गुंडाराजमुळेच चाकणपासून हा भाग वेगळा करून त्यासाठी स्वतंत्र पोलिस ठाणे म्हणजे म्हाळुंगे चौकीची स्थापना करण्यात आली आहे. या भागात मोठ्या संख्येने परप्रांतीय असून ते गुन्हा केल्यानंतर आपल्या राज्यात पुन्हा आश्रयाला जात असल्याने त्यांना पकडून आणून गुन्ह्यांची उकल करणे पोलिसांना अवघड झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com