शिवसेनेचे ब्लॅकमेलिंगचे धंदे माहीत आहेत : आशिष शेलारांची सडकून टीका

स्थानिक संस्था निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी शेलार सध्या राज्यभर दौरा करीत आहेत. आज ते पुणे जिल्हा भेटीवर होते.
Ashish Shelar
Ashish Shelar

पिंपरी : राज्यात सर्वसामान्य जनतेला भेडसावणा-या समस्या सोडविण्याऐवजी महाविकास आघाडीच्या सरकारमधील (Mahavikas Aghadi Govt) घटक पक्ष स्वबळाची भाषेत मश्गूल आहेत. एक स्वबळाची भाषा करतो, दुसरा अग्रलेख लिहीतो, तिसरा दिल्लीत जातो. जनतेच्या प्रश्नांची मात्र त्यांना काळजी नाही. यामुळे ‘जनता कोमात, तर स्वबळाची छमछम जोमात,’अशी सडकून टीका माजी मंत्री व भाजपाचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी पिंपरीत केली. मराठा व ओबीसी आरक्षण घालवून जाती-जातीत भांडणे लावायचा या सरकारचा मानस असल्याचा आरोपही त्यांनी केला. (BJP leader Ashish Shelar criticizes Shivsena in PCMC)

``माजी गृहमंत्री फरार आहेत. पोलिसांकडून वसूलीचे काम सुरु आहे. यांच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण गेले. ओबीसींचे राजकीय आरक्षणही ते टिकवू शकले नाहीत. जनतेच्या प्रश्नांकडे यांचे लक्ष नाही. शेतकऱ्यांना बनावट खत मिळाले आहे. त्यांचा पिकविम्याचा प्रश्न आहे. त्यांची कर्जमुक्ती झालेली नाही. महिला अत्याचार व सायबर गुन्हे वाढले आहेत. दुसरीकडे दररोज सकाळी दोन गोष्टी ते करतात. एक म्हणजे स्वबळाची भाषा आणि दुसरी म्हणजे सरकार पाच वर्षे टिकणार या मंत्राचा जप``, अशी घणाघाती टीका शेलार यांनी केली.

पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे (पीसीएनटीडीए) एका रात्रीत पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए)विलीनीकरण म्हणजे ‘भूखंडाचे श्रीखंड पार्ट टू’ आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

स्थानिक संस्था निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी शेलार सध्या राज्यभर दौरा करीत आहेत. आज ते पुणे जिल्हा भेटीवर होते. यावेळी त्यांनी पिंपरी-चिंचवडमधील पक्षाचे आमदार महेश लांडगे व लक्ष्मण जगताप यांच्या भेटी घेऊन आगामी महापालिका निवडणूक तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारचा खरपूस समाचार घेतला. त्यातही शिवसेनेवर ते अतिशय कडवट बोलले. शिवसेना नेते संजय राऊत यांनी नुकत्याच केलेल्या शहर दौऱ्यात पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपची सत्ता ही सूज असून त्यांचे दोन्ही आमदार ठेकेदारीत गुंतल्याचा आऱोप केला होता. त्याचा समाचार घेताना शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकल्याने त्यांचे नेते असे बेताल बोलू लागले आहेत,असे ते म्हणाले. ही आमची सूज, तर पालिकेतील अवघे नऊ नगरसेवक ही काय शिवसेनेची बूज आहे का असा उपहास त्यांनी केला. त्यांचे  ब्लॅकमेलिंगचे धंदे माहित असून पिंपरी-चिंचवडमधील स्मार्ट सिटीच्या ठेकेदारांनाही त्यांनी ब्लॅकमेल केले असल्याचा सनसनाटी आरोप त्यांनी केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात गुन्हेगारानेही लावलेले फ्लेक्स हा त्यांच्या पक्षाने आत्मपरिक्षण कऱण्याचा विषय आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com