सुनील शेळकेंची ती मागणी मान्य करत बाळा भेगडेंनी उलटवला डाव ! - Bala Bhegade agreed to MLA Sunil Shelke's demand for education fee concession | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

सुनील शेळकेंची ती मागणी मान्य करत बाळा भेगडेंनी उलटवला डाव !

उत्तम कुटे 
शनिवार, 19 जून 2021

उलट शेळकेंचा डाव भेगडे यांनी त्यांच्यावरच शिताफीने उलटवला. 

पिंपरी : कोरोनाच्या संकटात मावळ तालुक्यातील (जि. पुणे) पालकांना मुलांच्या शैक्षणिक शुल्कात सवलत मिळवून देण्यासाठी शिक्षण संस्थाचालकांच्या बैठकीकरिता पुढाकार घेण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी केलेली मागणी भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मान्य केली आहे. भेगडे यांनी याबाबत तहसीलदारांना बैठक घेण्यासाठी पत्र दिले आहे. एवढेच नाही तर कोरोना महामारीचा मोठा फटका बसलेल्या घटकाला आपल्या सरकारकडून आर्थिक मदतीची मोठी अपेक्षा असून ती मिळवून देण्यासाठी तालुक्याचे आमदार म्हणून आपण पुढाकार घ्यावा, असा पलटवार यानिमित्ताने शेळकेंवर करण्यास भेगडे विसरले नाहीत. (Bala Bhegade agreed to MLA Sunil Shelke's demand for education fee concession)

मावळ तालुक्यातील अनेक शिक्षण संस्थांचे अध्यक्ष असल्याने बाळा भेगडे यांच्याकडे शेळके यांनी वरील मागणी १४ जून रोजी पत्राव्दारे करून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ती त्यांनी होऊ दिली तर नाहीच. उलट शेळकेंचा डाव त्यांच्यावरच शिताफीने उलटवला. 

हेही वाचा : शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढविण्याबाबत प्रफुल्ल पटेल म्हणतात....
 

भेगडे यांनी शेळके यांच्या एका पत्राचे उत्तर शुक्रवारी (ता. १८ जून) रोजी दोन पत्रांनी दिले. एक त्यांनी ते शेळके यांना, तर दुसरे मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना पाठवले. शेळके यांच्या पत्राद्वारे त्यांची कोंडी करण्याचा डाव भेगडे यांनी खेळला, तर तहसीलदारांना शिक्षण संस्थाचालकांची बैठक बोलावण्यास सांगून त्यांनी शेळके यांच्या कोंडीतून स्वःताची सुटका करून घेतली. गेल्या २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी घेतलेल्या बैठकीसाठी जसा पुढाकार घेतला, तसा तो २०२१-२२ साठीही घेण्यास भेगडेंनी तहसीलदारांना सांगितले आहे.

कोरोना काळात सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना अनेक शैक्षणिक संस्थांनी शैक्षणिक फीसाठी पालकांकडे तगादा लावला आहे. त्यामुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी ही बैठक घेण्याची मागणी आमदार सुनील शेळके यांनी माजी आमदार बाळा भेगडे यांच्याकडे केली होती.

त्याला उत्तर देताना भेगडे यांनी त्यासाठी पुढाकार घेण्याचे मान्य केले. शिवाय योग्य ती पाऊले सर्वांना बरोबर घेऊन उचलू, असेही सांगितले. हे सांगताना राजकारणापलिकडे जाऊन या प्रश्नाकडे बघण्याची गरज असल्याचा टोलाही लगावला. तसेच, विद्यार्थी व संस्थांचा विचार करताना टोलवाटोलवी न करता दोन्ही बाजूंने गांभीर्याने विचार करून त्याबाबत सरकारकडे पाठपुरावा केला पाहिजे, असे म्हणत या समस्येचा चेंडू एकप्रकारे पुन्हा शेळके यांच्याकडे टोलवला आहे.

शाळांच्या फीमध्ये सूट देण्याबाबत संस्थाचालकांच्या बैठकीत निर्णय घेऊ. पण, कोरोनामुळे मोठा फटका बसलेल्या समाज घटकाला आपल्या संबंधाचा वापर करून त्यांना आणि विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांनाही सरकारकडून अपेक्षित असलेली आर्थिक मदत मिळवून द्याल, अशी अपेक्षा आहे, असे सांगत शेळके यांचा डाव त्यांच्यावरच भेगडे यांनी उलटवण्याच प्रयत्न केला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख