सोलापूरच्या उपमहापौरांचे `फरार` होणे दोन पोलिस अधिकाऱ्यांना भोवले : एक निलंबित, दुसरा कंट्रोल रुमला - pimpri police commissioner takes action against two officers for helping rajesh kale in absconding | Politics Marathi News - Sarkarnama

सोलापूरच्या उपमहापौरांचे `फरार` होणे दोन पोलिस अधिकाऱ्यांना भोवले : एक निलंबित, दुसरा कंट्रोल रुमला

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 3 जून 2020

राजेश काळे यांनी चतुराईने पोलिसांना गंडविले की पोलिसांनी गंडवून घेतले?

पुणे : सोलापूरचे उपमहापौर राजेश दिलीप काळे यांना दोन गुन्ह्यांत मदत करणे पिंपरी-चिंचवडच्या पोलिसांना चांगलेच महाग पडले आहे. काळे यांना सोलापुरातून गाजावाज करून फसवणुकीच्या गुन्ह्यातून पकडून सांगवी पोलिस ठाण्यात आणले होते. मात्र प्रत्यक्षात त्यांना अटक करून न्यायालयाता नेण्याऐवजी पोलिसांनी त्यांना ठाण्याबाहेर सहज जाऊन दिले. या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली असून उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे यांना निलंबित करण्यात आले आहे. 

सोलापूर महापालिकेचे उपमहापौर राजेश दिलीप काळे यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शुक्रवारी (ता. 29) सोलापुरातून ताब्यात घेतले. त्यांना 30  मे रोजी न्यायालयात दाखल करण्यात येणार होते. मात्र त्या सायंकाळी उशिरापर्यंत अटकेची पूर्तता न झाल्याने काळे हे सरळ पोलिस ठाण्यातून फरार झाले. त्याला पोलिसांची साथ होती की काय, असा सुरवातीपासून संशय होता. मात्र काळे यांना शिंका आल्याने, ताप असल्याने कोरोनाचा संशय होता. ती भीती असल्याने त्यांना सोडून दिल्याची सारवासारव नंतर पोलिसांनी केली होती. 

फ्लॅट खरेदी-विक्रीमध्ये सुमारे 20 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर निगडी व सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सोलापूरातील विजापूर नाका पोलिस ठाण्यात सांगवी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक व अन्य कर्मचारी शुक्रवारी सकाळी गेले होते. त्यानंतर त्यांनी काळे हा कुठे आहे, याची माहिती घेतली.  त्यांना  29 मे रोजी घरातून अटक केल्याचे सांगण्यात आले. रात्री उशिरा त्यांना पुण्यात आणण्यात आले. सांगवी पोलिस ठाण्यात त्यांना ठेवण्यात आले होते. त्यांना चोवीस तासांच्या आत न्यायालयात दाखल करणे आवश्यक होते. मात्र ती कार्यवाही होण्याच्या आतच ते फरार झाल्याचे वृत्त सर्वप्रथम  सरकारनामाने दिले होते.

त्यांना पोलिसांनी जाऊ दिले की ते पोलिसांना सांगून तेथून निघाले की तेथून फरार झाले, यावर तेव्हाच संशय व्यक्त झाला होता. सांगवी पोलिस त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेल्याचे उशिरापर्यंत सांगत होते. मात्र यात पोलिसांचा हलगर्जीपणा झाल्याचे दिसून असून पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त के. एल. बिष्णोई यांनी संंबधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई केली आहे.  

काळे यांच्याविरुद्ध दोन गुन्हे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात दोन गुन्हे दाखल आहेत. सिंधू सुभाष चव्हाण (रा. गोकुळ नगर, कोंढवा) यांच्या मुलाने 15 लाख रुपये देऊन फ्लॅट खरेदी केला होता. मात्र, मुलगा सचिन व पती सुभाष यांचा मृत्यू झाल्यानंतर त्या फ्लॅटवर गेल्यानंतर तो दुसऱ्याच व्यक्तीला विकल्याचे समोर आले. बॉम्बे मर्कंटाईल एमजी रोड शाखेतील बँक मॅनेजरला हाताशी धरून नीता सुरेश लोटे (रा. घोरपडी, पुणे) राजेश दिलीप काळे (रा. सांगवी, पिंपरी चिंचवड परिसर) यांनीच लिलावात तो फ्लॅट घेतल्याचे समोर आले. तर दुसरीकडे पिंपळे येथील एक प्लाॅट चौघांना विकून वेगवेगळ्या नावे त्या फ्लॅटवर राजेश काळे व निता लोटे यांनी चिंचवड स्टेशन परिसरातील देना बँकेतून कर्ज घेतले. बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी बँक मॅनेजर कुमुद बाबुराव वाळके यांनी निगडी पोलीस ठाण्यात राजेश काळे व निता लोटे यांच्याविरुद्ध फिर्याद दिली त्यानुसार त्या दोघांवर त्या ठिकाणीही गुन्हे दाखल झाले आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख