गाजावाजा करत पकडलेले सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे पोलिसांच्या तावडीतून फरार!

पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यास उशीर केल्याचा परिणाम
गाजावाजा करत पकडलेले सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे पोलिसांच्या तावडीतून फरार!
rajesh-kale-solapur

पुणे : मोठा गाजावाजा करत सोलापूर महापालिकेचे उपमहापौर राजेश दिलीप काळे यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शुक्रवारी (ता. 29) सोलापुरातून ताब्यात घेतले. त्यांना आज (ता. 30 मे) रोजी न्यायालयात दाखल करण्यात येणार होते. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत अटकेची पूर्तता न झाल्याने काळे हे पोलिसांच्या तावडीतून फरार झाल्याची चर्चा आहे. पोलिसांनी याबाबत अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. फ्लॅट खरेदी-विक्रीमध्ये सुमारे 20 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर निगडी व सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

सोलापूरातील विजापूर नाका पोलिस ठाण्यात सांगवी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक व अन्य कर्मचारी शुक्रवारी सकाळी गेले होते. त्यानंतर त्यांनी काळे हा कुठे आहे, याची माहिती घेतली.  त्यांना घरातून अटक केल्याचे सांगण्यात आले. रात्री उशिरा त्यांना पुण्यात आणण्यात आले. सांगवी पोलिस ठाण्यात त्यांना ठेवण्यात आले होते. त्यांना चोवीस तासांच्या आत न्यायालयात दाखल करणे आवश्यक होते. मात्र ती कार्यवाही होण्याच्या आतच ते पोलिस ठाण्यातून फरार झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

त्यांना पोलिसांनी जाऊ दिले की ते पोलिसांना सांगून तेथून निघाले की तेथून फरार झाले, यावर अद्याप प्रकाश पडायचा आहे. मात्र त्यांना सायंकाळी उशिरापर्यंत न्यायालयात दाखल करून रिमांडसाठी अर्ज केलेला नव्हता. पोलिस त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेल्याचे उशिरापर्यंत सांगत होते. मात्र अटकेची कारवाई होण्याआधीच त्यांनी सांगवी पोलिस ठाण्यातून धूम ठोकली. त्यामुळे अधिकृतरित्या `फरार` म्हणता येत नाही, असे फौजदारी कायद्यातील अभ्यासकांचे मत आहे. पण सोलापूरहून आणण्याचा उपयोग काय, असाही सवाल मग उपस्थित होत आहे.  

काळे यांच्याविरुद्ध दोन गुन्हे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात दोन गुन्हे दाखल आहेत. सिंधू सुभाष चव्हाण (रा. गोकुळ नगर, कोंढवा) यांच्या मुलाने 15 लाख रुपये देऊन फ्लॅट खरेदी केला होता. मात्र, मुलगा सचिन व पती सुभाष यांचा मृत्यू झाल्यानंतर त्या फ्लॅटवर गेल्यानंतर तो दुसऱ्याच व्यक्तीला विकल्याचे समोर आले. बॉम्बे मर्कंटाईल एमजी रोड शाखेतील बँक मॅनेजरला हाताशी धरून नीता सुरेश लोटे (रा. घोरपडी, पुणे) राजेश दिलीप काळे (रा. सांगवी, पिंपरी चिंचवड परिसर) यांनीच लिलावात तो फ्लॅट घेतल्याचे समोर आले. तर दुसरीकडे पिंपळे येथील एक प्लाॅट चौघांना विकून वेगवेगळ्या नावे त्या फ्लॅटवर राजेश काळे व निता लोटे यांनी चिंचवड स्टेशन परिसरातील देना बँकेतून कर्ज घेतले. बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी बँक मॅनेजर कुमुद बाबुराव वाळके यांनी निगडी पोलीस ठाण्यात राजेश काळे व निता लोटे यांच्याविरुद्ध फिर्याद दिली त्यानुसार त्या दोघांवर त्या ठिकाणीही गुन्हे दाखल झाले आहेत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in