ज्योतिरादित्य शिंदेंचे आश्वासन अन्‌ नवी मुंबईच्या कृती समितीकडून आंदोलन स्थगित

राज्य सरकारच्या कॅबिनेटने बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव पुढे पाठविण्याचा प्रयत्न केल्यास भूमिपुत्रांचे हे आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही दिला.
After the assurance of Jyotiraditya Shinde action committee suspended the agitation
After the assurance of Jyotiraditya Shinde action committee suspended the agitation

नवी मुंबई : लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी १६ ऑगस्टला पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला अखेर काही दिवसांनी स्थगिती देण्यात आली. केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची तसेच केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची दिल्ली येथे कृती समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली होती. या भेटीत प्रकल्पग्रस्तांच्या नेतेमंडळींनी भूमिपुत्रांच्या भावना मांडल्या. त्यामुळे १६ ऑगस्टला होणारे आंदोलन स्थगित करण्यात आले. (After the assurance of Jyotiraditya Shinde action committee suspended the agitation)

लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने आज पत्रकार परिषदेत घेण्यात आली. पनवेल शहरातील आगरी समाज मंडळाच्या महात्मा फुले सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेस कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, पनवेल महानगरपालिका उपमहापौर जगदीश गायकवाड, जे. डी. तांडेल, नंदराज मुंगाजी, दीपक म्हात्रे, राजेश गायकर, दीपक पाटील, मनोहर पाटील आदी समितीचे सदस्य उपस्थित होते.

१० जूनला झालेले साखळी आंदोलन, २४ जूनला झालेले सिडको घेराव आंदोलन व नऊ ऑगस्ट क्रांतिदिनी जिल्ह्या-जिल्ह्यात, तालुका-तालुक्यांत व गावागावांत झालेल्या प्रचंड संख्येचे मशाल मोर्चे आंदोलन या सर्व आंदोलनाची दखल घेत आणि कृती समितीच्या वतीने दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागलेच पाहिजे यासाठी पेटून उठलेल्या स्थानिक जनतेच्या भावना व आंदोलनला मिळालेला प्रचंड प्रतिसाद याची दखल केंद्राने घेतल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. राज्य सरकारने सिडकोमध्ये केलेला बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव दिल्लीत पाठविलेला नाही. राज्य सरकारच्या कॅबिनेटने असा ठराव केलेलाच नसल्याचे समजते.

ही परिस्थिती लक्षात घेता व १३ ऑगस्टला दिल्ली येथे केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी कृती समितीची बैठक झाली. याविषयी सविस्तर चर्चा झाली आणि प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्रांच्या भावना कानी घातल्या. केंद्रीय मंत्र्यांनीही या भावनेचा आदर केला; परंतु विमानतळाचे काम पूर्ण होणे हेही प्रकल्पग्रस्त व स्थानिकांच्या दृष्टीने आवश्यक आहे. ज्या केंद्र सरकारने नामकरण करायला हवे, त्याच मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाचा सन्मान ठेवून १६ ऑगस्टपासून कृती समितीने पुकारलेले आंदोलन तूर्त स्थगित करण्यात येत आहे, अशी घोषणा कृती समितीने आज पत्रकार परिषदेत केली. मात्र, राज्य सरकारच्या कॅबिनेटने बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव पुढे पाठविण्याचा प्रयत्न केल्यास भूमिपुत्रांचे हे आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही दिला. 

आंदोलनाच्या निमित्ताने रायगड, ठाणे, पालघर व मुंबई जिल्ह्यात अनेक प्रश्न समोर आले आहेत. ते एकत्रितरीत्या सोडविण्यासाठी पावसाळ्यानंतर भूमिपुत्र परिषदेचे आयोजन करण्याचे ठरविले आहे, अशीही माहिती पत्रकार परिषदेत दिली.

दिबांनी दिलेल्या मार्गातून प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र एकसंध झाला आहे. दिबांचे नाव विमानतळाला लागण्याबरोबरच प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रश्न मार्गी लावण्याचे काम कृती समितीच्या माध्यमातून केले जाणार आहे. केंद्राने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारनेही प्रकल्पग्रस्तांच्या भावनांचा आदर करावा, असे कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी सांगितले. 

दिबांचे नाव विमानतळाला लागलेच पाहिजे, ही भूमिका कायम ठेवत तीनवेळा आंदोलन झाले. या आंदोलनांना भूतो न भविष्यतो असा प्रतिसाद लाभला. ज्योतिरादित्य शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना आश्वस्त केले आहे. दिबांचे नाव विमानतळाला लावण्यासाठी यापुढेही जनजागृती आणि संघर्ष करण्याची तयारी कायम राहील, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com