निवडणुकीतील पराभव अद्याप बाळा भेगडेंच्या पचनी पडलेला दिसत नाही : शेळके

मी चुकीचे वागलो, तर जनता मला घरी बसविण्याआधी मी स्वत:च पदावरून पायउतार होईन.
निवडणुकीतील पराभव अद्याप बाळा भेगडेंच्या पचनी पडलेला दिसत नाही : शेळके
MLA Sunil Shelke replied to the allegations of former minister Bala Bhegade

तळेगाव दाभाडे (जि. पुणे)  ः भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार किरीट सोमय्या आणि माजी मंत्री बाळा भेगडे यांनी आपणावर बेकायदा उत्खनन करून सरकारचा दहा कोटी रूपयांचा महसूल बुडविला असल्याचा आरोप केला आहे. या दोघांनी आपल्यावर राजकीय आकसापोटी केलेल्या दबाव तंत्राचा भाग असून, यामध्ये काहीही तथ्य नसल्याचा खुलासा राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केला. (MLA Sunil Shelke replied to the allegations of former minister Bala Bhegade)

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या व माजी मंत्री बाळा भेगडे यांनी शुक्रवारी (ता. १३ ऑगस्ट) रोजी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे मावळचे आमदार शेळके यांच्यावर दहा कोटी रूपयांचा महसूल बुडविल्याचे आरोप केले होते. आमदार शेळके यांनी आज (ता. १४ ऑगस्ट) पत्रकार परिषद घेऊन संबंधितांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेतला.

आमदार शेळके म्हणाले की, मी खाण क्रशरचा व्यवसाय गेली १० ते १५ वर्षांपासून करतो आहे. माझ्या व्यवसायाच्या ठिकाणी संबंधितांनी पाहणी करून खोट्या माहितीच्या आधारे बिनबुडाचे आरोप केले आहेत. मला विचारले असते तर मी स्वत: जागेवर जाऊन कागदपत्रांसह व्यवसायाची माहिती दिली असती आणि हा व्यवसाय मी सचोटीने करत असल्याची खात्री करून दिली असती. तळेगाव नगरपरिषदेची सत्ता भारतीय जनता पक्षाकडे आहे. नगरपरिषदेच्या मालकीच्या तळ्याचे बेकायदा खोदकाम केल्याची शासकीय पातळीवर चौकशी चालू आहे. यामध्ये दोषारोप सिद्ध होउन कारवाई होणार, हे निश्र्चीत आहे. नजीकच्या काळात नगरपरिषदेच्या निवडणुका होत आहेत, त्यामुळे बदनामी टाळण्यासाठी आपणावर राज्य पातळीवरील नेत्यांना आणून दबाब तंत्राचा वापर केला जात आहे, असा आरोपही आमदार शेळके यांनी या वेळी बोलताना केला. 

अशा प्रकारच्या दबावतंत्राला आपण बळी पडणार नसून, त्यांनी केलेल्या आरोपाच्या अनुषंगाने खुशाल सखोल चौकशी करावी. चौकशीअंती सत्य बाहेर येईल. माजी मंत्री बाळा भेगडे यांचे नाव न घेता निवडणुकीतील पराभव त्यांच्या अद्याप पचनी पडलेला दिसत नसल्याचे सांगत शेळके म्हणाले की, आता निवडणुका संपल्या आहेत. आता तालुक्याचा विकास हे ध्येय ठेवून आपण काम सुरू केले आहे. आकस बाजूला ठेवून तालुक्याच्या विकास कामात सहाय्यभूत भूमिका त्यांनी बजवावी, असे आवाहनही आमदार शेळके यांनी बाळा भेगडे यांना केले.

कामावर आपला भरोसा असून, कामामुळेच आपणाला जनतेने स्वीकारले आहे. मी चुकीचे वागलो, तर जनता मला घरी बसविण्याआधी मी स्वत:च पदावरून पायउतार होईन, असे सांगून विरोधकांनी खोट व चुकीचे आरोप करणे थांबवावे, असे आवाहनही शेळके यांनी केले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in