एका मंत्र्यांच्या पीएकडून ठार मारण्याची धमकी; सोमय्या यांचा धक्कादायक दावा

किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
 Kirit Somaiya .jpg
Kirit Somaiya .jpg

ठाणे : ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे घोटाळे उघडकीस आणले जात आहेत. त्यामुळे एका मंत्र्याच्या स्वीय सहाय्यकाने दूरध्वनीवरून मला ठार मारण्याची धमकी दिली. त्यासाठी दोन वर्षांपूर्वी माणसे पाठविण्यात आली होती. त्यामुळे मला मारण्यासाठी अगदी दाऊदला पाठवले तरी, मी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचा निर्धार भाजपचे (BJP) माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ठाण्यात व्यक्त केला. (Kirit Somaiya meet to Commissioner Dr. vipin Sharma) 

ठाणे पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची सोमय्या यांनी बुधवारी भेट घेतली. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी 'विहंग गार्डन' येथे केलेल्या बेकायदा बांधकामावरील २१ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्याची मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ठाकरे सरकारमधील मंत्र्यांची नावे याआधीच घोषित केल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांचे १२ मंत्री हे भ्रष्टाचारी असल्याचा सनसनाटी आरोप केला. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना वाचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा अट्टाहास का आहे, असा सवालही त्यांनी केला. 

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यामुळे सोमय्या सध्या अनेकांच्या निशाण्यावर आहेत. भावना गवळी यांच्या वाशिम येथील साखर कारखान्याची पाहणी सोमय्या यांनी केली होती. त्यावेळी त्यांच्या वाहनावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती. त्याची गंभीर दखल घेत केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमय्या यांना झेड दर्जाची सुरक्षा दिली आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत आता ४० पोलिस असणार आहेत.     
 
फौजदारी गुन्हा दाखल करणार : सरनाईक

किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी १०० कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा त्यांच्यावर दाखल केला आहे. असे असतानाही सोमय्या यांच्याकडून आरोप सुरुच आहेत. त्यामुळे आता सरनाईक यांनी सोमय्या यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. 

या संदर्भात सरनाईक यांनी आपले वकिल अमित नाडकर्णी यांच्या माध्यमातून एक पत्र प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सोमय्या यांनी खोट्या माहितीच्या आधारे अपमानकारक मजकूर प्रसिद्ध केला व मानहानी केली. त्यामळे सरनाईक यांनी आपली मानहानी केल्याबाबत सोमय्या यांना नोटीस देऊन सदर प्रकरणी माफी मागण्याचा पर्याय दिला होता. अन्यथा त्यांच्या विरूध्द  १०० कोटींचा दावा दाखल करू असे कळवले होते. 

मात्र, सोमय्या यांनी त्यांना दिलेल्या कायदेशीर सुचनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून, सूडभावनेने त्रोटक जबाब उत्तरादाखल दिला. त्यामुळे सरनाईक यांनी सोमय्या यांचे विरूध्द १०० कोटीचा दिवाणी दावा दाखल केला. यामध्ये न्यायालयाने  नोटीस काढलेली आहे. या दाव्याची जाणीव असून देखील त्यांनी बदनामी करण्याचे कृत्य अविरतपणे चालू ठेवले आहे. वारंवार सरनाईक यांच्याविरूद्ध कुरापती काढून बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करण्यामध्ये समाज माध्यमांचा वापर केला. तसेच आताही चालू आहे. सोमय्या यांना ठाणे येथील दिवाणी न्यायालयात प्रलंबित असलेल्या दिवाणी दाव्याबाबत माहिती व जाणीव आहे, असेही पत्रात म्हटले आहे. 

तरी देखील सोमय्या यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून सरनाईक यांच्या विहंग गार्डन स्किम विषयावर आयुक्तांना भेटणार असल्याचे जाहीर केेले होते. त्यानुसार त्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या दालनाबाहेर प्रसार माध्यमांसमोर हजर राहून परत एकदा प्रसारमाध्यमांना चुकीची माहिती पुरविली आहे. सोमय्या यांनी बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करणे व खास करून सरनाईक यांची बदनामी करणे चालू ठेवले आहे. त्यामुळे त्यांनीच फौजदारी कारवाईसाठी आमंत्रित केले आहे. त्यामुळे आता सोमय्या यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा सरनाईक यांनी दिला आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com